पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/१३९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गावांमधले शेतकरी बंड करून उठतील; स्वत:ला कर्जमुक्त म्हणून घोषित करतील. आज लोकांना खायला अन्न नाही. आपण सरकारी धान्य गोदामांवर लोकांचे मोर्चे न्यायचे, कुलुपे फोडायची, आतले धान्य बाहेर काढायचे व गोरगरीब जनतेला वाटून द्यायचे. सगळेच लोक मग बंड करून उठतील. पोलीस चौक्यांवर आणि पोलीस तुकड्यांवर आपण हल्ले करायचे आणि त्यांच्याकडील बंदुका हिसकावून घ्यायच्या. हेच ते लोकयुद्ध आणि हे जिंकल्यावर मगच गोरगरिबांचे व श्रमिकांचे राज्य स्थापन होईल." अशा साधारण स्वरूपाची त्यांची प्रक्षोभक मांडणी होती. तरुण मने पेटून उठतील अशीच ती होती. जोर्वे आणि गुहा या दोन्ही ठिकाणच्या शिबिरांच्या आधी खेड्यापाड्यांमधून रावसाहेबांनी बऱ्याच प्रचारसभा घेतल्या होत्या. तिथल्या त्यांच्या भाषणांचा गुहाच्या शिबिरामध्ये बऱ्याच जणांनी कौतुकाने उल्लेख केला. "त्या प्रचारसभांमध्ये तुम्ही जे भाषण करायचा तेच इथेही सगळ्या कार्यकर्त्यांसमोर करून दाखवा, म्हणजे त्यापासून इतरांनाही बरंच काही शिकता येईल,” असे आयोजकांनी सुचवले. रावसाहेबांचे भाषण तयार होतेच. लगेच व्यासपीठावर जाऊन त्यांनी ते भाषण दिले. सगळ्यांना ते खूप आवडले. स्वतः गोदूताईंनी त्यांची पाठ थोपटली, सर्वांसमक्ष वाहवा केली. गोदूताईंचे पक्षातील ज्येष्ठ स्थान विचारात घेता हा फारच मोठा सन्मान होता. होतकरू आणि नेतृत्वगुण असलेले तरुण हेरायचे; कौतुक करून, उत्तेजन देऊन त्यांना पुढे आणायचे हा कम्युनिस्ट कार्यपद्धतीचा एक महत्त्वाचा भाग होता. कॉम्रेड शब्दाचा अर्थच मित्र हा होता आणि ही कॉम्रेडरी (मैत्री) पक्षकार्यकर्त्यांमध्ये खूप असायची. बहुतांशी सुस्त असलेल्या समाजामधले आपण क्रांतिकारक आहोत, आपण प्रवाहाविरुद्ध पोहतो आहोत, अशा परिस्थितीत आपला गट बांधून ठेवणे आवश्यक आहे आणि म्हणूनच ही कॉम्रेडरी आवश्यक याची नेत्यांना जाणीव होती. हे स्नेहबंध अर्थातच कृत्रिमरीत्या जोपासलेले नव्हते; प्रत्येक गिऱ्हाइकाचे हसून स्वागत करा म्हणजे आपल्या मालाची विक्री वाढेल, हे जसे हल्लीच्या मार्केटिंग स्कूलमध्ये शिकवले जाते तसा हा प्रकार नव्हता. सर्वस्वाचा त्याग करून एखाद्या ध्येयाच्या मागे लागलेल्या तरुण कार्यकर्त्यांमध्ये हे मैत्र आतूनच कुठूनतरी उमलून येई. अवघड वाटेवरून पुढे जात राहण्याचे आत्मबळ त्यातून मिळायचे. ही कॉम्रेडरी हे जगभरच्या सर्वच कम्युनिस्ट गटांचे एक फार मोठे सामर्थ्य होते. टिटवाळ्याच्या परिषदेत जेव्हा 'खूप लांबून सायकल दामटत आलेले विद्यार्थी' म्हणून • त्यांचे जाहीर कौतुक झाले होते तेव्हाही त्यांना याच कॉम्रेडरीचा प्रत्यय आला होता. आता गुहामध्ये गोदूताईंकडून होत असलेले कौतुकही त्याच लाल ताऱ्याची साथ...