पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/१३८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

कॉम्रेड एस. एकपात्री कार्यक्रमांमुळे गाजलेल्या रंगनाथ कुलकर्णी यांचे वडील), व्ही. देशपांडे, कॉ. एस. एस. मिरजकर, कॉ. नांदेडकर, कॉ. एस. ए. डांगे हे नेते शिबिराला हजर होते. पण यांत सर्वांत जहाल भूमिका कॉ. बी. टी. रणदिवे यांची होती. त्यांची छाप सर्व शिबिरावर होती. अखिल भारतीय पातळीवर ते त्यावेळी कम्युनिस्ट पक्षाचे सर्वेसर्वाच बनल्यासारखे होते. जिल्ह्यातील दुसरे कार्यकर्ता शिबिर पुढच्याच वर्षी, म्हणजे १९४६ साली झाले. याचे नेतृत्व अण्णाभाऊ आणि चंद्रभान आठरे पाटील यांनी केले. राहुरी तालुक्यातील गुहा या गावी ते भरले. संगमनेरहून २८ मैलांवर असलेल्या या गावी रावसाहेब, भाऊसाहेब व त्यांचे मित्र अक्षरशः चालत गेले! परिषदेला पोहोचेस्तोवर सगळ्यांचे पाय चांगलेच सुजले होते. परिषदेचे प्रत्यक्ष आयोजन कॉ. पी. बी. कडू पाटील व कॉ. विनायकराव ताकटे पाटील यांनी केले. वाबळे पाटील यांच्या मळ्यात हे शिबिर भरले. त्यांचा मळा प्रवरा उजव्या कॅनॉलच्या कडेला गुहा गावच्या शिवारात होता. तिथेच त्यांची मोसंबीची व इतर फळझाडांची बाग होती. त्या बागेतच शिबिर भरले. या शिबिराचे वैशिष्ट्य म्हणजे सर्व कार्यकर्त्यांना, म्हणजेच कॉम्रेड्सना, गनिमी युद्धाच्या तंत्राची माहिती दिली गेली. प्रत्यक्ष सराव व्हावा म्हणून रात्री दोन-तीन तास लुटपुटीचे गनिमी युद्धही खेळले गेले. कॅनॉललगतच्या पाटाचे दोन्ही भराव आणि त्यांमधील खोलगट भाग, पाटाच्या कडेची आंब्याची झाडे आणि मळ्यातली इतर फळझाडे या सर्वांचा गनिमी काव्याच्या प्रात्यक्षिकासाठी चांगला उपयोग झाला. या गनिमी युद्धासाठी 'पॉवेल' हा एक परवलीचा शब्द (कोडवर्ड) ठरवला होता. समोरच्याने तो उच्चारला की समजायचे, समोरचा आपला कॉम्रेड आहे, शत्रू नाही. ही सर्व तालीम कार्यकर्त्यांच्या दृष्टीने खूप आकर्षक झाली; पण हे सगळे खूप गंभीरपणे घ्यायचे आहे, कारण प्रत्यक्ष लढाई अगदी जवळ येऊन ठेपली आहे, हे सर्वांना पुन:पुन्हा सांगितले गेले. शिबिराला मार्गदर्शक म्हणून शामराव व गोदूताई परुळेकर, डी. बी. कुलकर्णी, एस. व्ही. देशपांडे हे नेते आले होते. अण्णाभाऊ, चंद्रभान आठरे पाटील, बुवासाहेब नवले, राम नागरे हे जिल्हानेतेही होतेच. शिबिरात दोन दिवस अभ्यासमंडळे चालली. त्यांत परुळेकर पतिपत्नींनी अतिशय जहाल भाषणे केली. शामराव परुळेकर आपल्या भाषणात चळवळीची भावी दिशा काय असावी याबद्दल बोलले. "नवीन शासनाबरोबर कोणत्याही परिस्थितीत संघर्ष घडवून आणायचा. सावकारांचे दस्तऐवज त्यांच्या तिजोया फोडून बाहेर काढायचे, सार्वजनिक ठिकाणी त्यांची होळी करायची आणि 'आजपासून हे शेतकरी कर्जमुक्त झाले आहेत' असे घोषित करायचे. ते बघितल्यावर मग आजूबाजूच्या सगळ्याच अजुनी चालतोची वाट... १३८