पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/१३७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

यानंतर रावसाहेबांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी खेडोपाडी कम्युनिस्ट प्रचाराचा अगदी धूमधडाका उडवून दिला. सभेचे एक मॉडेलच त्यांनी तयार केले. एखाद्या गावात गेल्यागेल्या ते स्वतःच मोठ्या आवाजात दवंडी देत गावभर फेरी मारत. "ऐका हो ऐका! आज अमुकअमुक वेळेला देवळापुढील पटांगणात किसान सभेचे प्रसिद्ध पुढारी भाऊसाहेब थोरात, धर्मा पोखरकर व रावसाहेब शिंदे यांची जाहीर सभा होणार आहे. तरी सर्वांनी या सभेला यावे हो ऽऽ यावे ऽऽ” अशा आशयाची ती दवंडी असायची. मग एखाद्या टेबल-खुर्चीचा ते शोध घेत. बहुधा गावातल्या शाळेत ती मिळायची. ती उचलून सभास्थानी नेली जायची. सगळा प्रवास सायकलवरूनच होत असल्यामुळे बरोबर टेबल-खुर्ची घेऊन दौरा करणे अशक्य होते. पक्ष नवाच असल्याने गावांमधून स्थानिक कार्यकर्ते असे नसतच; त्यामुळे वक्त्यांनाच स्वयंसेवकगिरीही करावी लागे. टिटवाळा परिषदेनंतर गाण्यांचे महत्त्व रावसाहेबांना व त्यांच्या सहकाऱ्यांना पुरते पटले होते; त्यामुळे कुठल्याही सभेची सुरुवात ते नेहमी गाण्यांनीच करत. गाणी चढ्या आवाजात म्हणायची पद्धत होती; गर्दी जमवायलाही त्याचा उपयोग होई. 'किसान सभा, शेतकऱ्यांची माउली, सुखाची सावली, हाय हो' यासारख्या गाण्यांनी सुरुवात होई. कार्यकर्त्यांनी संगीताचा शास्त्रशुद्ध अभ्यास असा काहीच केलेला नसायचा, सोबतीला वाद्येही कुठलीच नसायची. पण ताल आणि ठेका लोकांना आकर्षित करायचा. गाणी अर्थपूर्ण असत आणि मुख्य म्हणजे कार्यकर्त्यांची कळकळ आणि उत्साह ओळींमधून पाझरायचा; त्यामुळे त्यांची गाणी मनाला स्पर्श करत. अशी गाणी म्हणजे खेडेगावांमध्ये मोठेच नावीन्य होते; ग्रामीण भागात त्या काळी फक्त भजने आणि लावण्या ठाऊक होत्या. त्या कालखंडात नगर जिल्ह्यामध्ये दोन महत्त्वाची कार्य कम्युनिस्ट पार्टीने घेतली. पहिले शिबिर १९४५ साली भाऊसाहेब थोरात यांच्या संगमनेर तालुक्यातील जोर्वे या गावी झाले. तिथल्या प्रशस्त अशा दत्त मंदिरात. मंदिराला चारी बाजूंनी भिंतीची तटबंदी आहे. मंदिराला लागूनच प्रवरा नदी वाहते. शिबिराचे आयोजन भाऊसाहेबांनी अण्णाभाऊंच्या मार्गदर्शनाखाली केले होते. चंद्रभान आठरे पाटील, रामभाऊ नागरे, बुवासाहेब नवले यांचीही साथ होतीच. बोर्डिंगमधल्या प्रमुख सहकाऱ्यांबरोबर रावसाहेब या शिबिरात खूप उत्साहाने सहभागी झाले होते. एकूण दोन-तीनशे कार्यकर्ते उपस्थित होते. सर्वांच्या राहण्या- जेवणाची व्यवस्था भाऊसाहेबांनीच केली होती. शिबिराचा भर भाषणे व अभ्यास मंडळे यांवर होता. कॉ. कऱ्हाडकर, कॉ. डी. बी. कुलकर्णी (पुढे आपल्या लाल ताऱ्याची साथ...