पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/१३६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

वेगळे. ते बुटके आणि काळे-सावळे होते. 'अकलेची गोष्ट' हा त्यांनी लिहिलेला वग त्यांनी परिषदेत सादर केला. बनवाबनवी करणाऱ्या एका लुच्च्या सावकारावर एक हुशार शेतकरी कसा बाजी मारतो याची ही कथा. त्यातील अण्णांची शेतकऱ्याची व गव्हाणकरांची गवळ्याची भूमिका अप्रतिम झाली; सवाल- जबाबाच्या वेळी सतत टाळ्यांची दाद मिळत होती. पुढे वि. स. खांडेकर, आचार्य अत्रे, पु. ल. देशपांडे यांच्यासारख्या मान्यवर लेखकांनीही या कलापथकाची खूप प्रशंसा केली. महाराष्ट्रात लोकजागृतीचे मोठे कार्य या कलापथकाने केले. दुर्दैवाने या गीतांच्या कुठल्याच कंपनीने कधी ध्वनिमुद्रिका (रेकॉर्ड्स) काढल्या नाहीत, 'प्रचारकी गाणी' म्हणून त्यांना कमी लेखले गेले; नाहीतर गायक म्हणूनही हे कलावंत रसिकमान्य झाले असते. रावसाहेबांना स्वत:ला लहानपणापासून गाणी फार आवडत. त्यामुळे या कलापथकाचा कार्यक्रम त्यांना फारच आवडला. एकूणच मौखिक परंपरा लिखित शब्दापेक्षा अधिक प्राचीन आहे; शब्दांना ताल, संगीत आणि सूर यांची जोड मिळाल्यामुळे भावना हेलावून टाकण्याची गाण्यांची ताकद ही भाषणांपेक्षा अधिक आहे याचा प्रत्यय त्यांना या परिषदेत आला. आपला संदेश बहुजनसमाजापर्यंत नेण्यासाठी संगीत हे किती प्रभावी माध्यम आहे हेही त्यांच्या लक्षात आले. चारी बाजूंना पसरलेली आमराई, कडेने वाहणारी भातसा नदी, मोकळा वारा, रात्रीचा काळोख आणि समोर पसरलेला विशाल जनसमुदाय या सगळ्याचा एकत्रित परिणाम उत्कट सुरांना जादूचा स्पर्श करत होता. प्रचारार्थ होणाऱ्या आपल्या सभांमध्ये नंतर त्यांनी गाण्यांचा खूप वापर केला. व्यक्तिश: एखादा विचार माणसाला पटणे व त्यानुसार जगण्याचा त्याने प्रयत्न करणे हे महत्त्वाचे आहेच; पण जेव्हा हजारो लोक एकत्र येतात, एकाच विचाराने भारावून जातात तेव्हा निर्माण होणाऱ्या सामूहिक चेतनेमध्ये एक आगळीच शक्ती असते. 'मास सायकॉलॉजी'चा अवलंब व्यापक समाजपरिवर्तनासाठी करावाच लागतो, याचीही जाण टिटवाळा परिषदेत आली. ते वातावरण आठवताना रावसाहेब म्हणतात : "टिटवाळा परिषद माझ्या मनात एवढी ठसली होती, की आजही ते चित्र डोळ्यांपुढे उभे आहे. वारली चळवळीचे दर्शन मला प्रथम इथेच झाले. त्याचे फारच अप्रूप वाटले. परिषदेची सांगता होताना इतक्या दूरवरून सायकलवर आलेले विद्यार्थी म्हणून आमचे जाहीर कौतुक झाले. कोणीतरी आमचा फोटोही घेतला. मोठ्या उत्साहाने आम्ही परत फिरलो." 31 अजुनी चालतोची वाट... १३६