पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/१३५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अशा पाच जणांनी परिषदेला जायचे ठरवले. पैसे वाचवण्यासाठी सायकलने जायचे ठरले. त्यांच्यापैकी कोणीही पूर्वी कधीच टिटवाळ्याला गेले नव्हते. टिटवाळा नेमके कुठे आहे हेही कोणालाच ठाऊक नव्हते. बरोबर दशम्यांचे गाठोडे घेऊन सगळे निघाले. वाटेत प्रचंड गारठा होता. सायकलींनाही एक-दोन अपघात झाले. पण लाल बावट्याची गाणी मोठमोठ्याने म्हणत यांचा सायकल मोर्चा उत्साहाने पुढे जात राहिला. मजल दरमजल करत बालचमू एकदाचा टिटवाळा येथे पोचला. इतक्या लांबून आलेले विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून या पाचही जणांचे परिषदेत जोरदार स्वागत केले गेले. परिषदेला प्रचंड जनसमुदाय जमला होता व त्यात आदिवासी बहुसंख्य होते. हा आदिवासी समाज मुख्यत: वारली होता. तिथल्या जमीनदारांकडून त्यांचे प्रचंड शोषण होत असे. त्यांचे दारिद्र्य आणि एकूण मागासलेपण केवळ शब्दातीत होते. टिटवाळा येथे भातसा नदीच्या काठी असलेल्या एका प्रचंड आमराईत ही किसान परिषद भरली होती. ठाणे जिल्ह्यातील डहाणू व उंबरगाव तालुक्यातून वारली आदिवासींचा खूप मोठा मोर्चा आला होता. केवळ लज्जारक्षणार्थ कापडाचा तुकडा पांघरलेले हे वारली स्त्री पुरुष होते. स्वतः गोदूताईंनी या मोर्च्याचे नेतृत्व केले होते. संध्याकाळपर्यंत परिषदेचे कामकाज चालले. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर अनेक ठराव मंजूर करण्यात आले. 'सावकारी पाशातून शेतकऱ्यांची मुक्तता झालीच पाहिजे' आणि 'कसेल त्याची जमीन' ही तर परिषदेची घोषवाक्येच झाली होती. रात्री कलापथकाचा कार्यक्रम झाला. शाहीर अमर शेख, अण्णा भाऊ साठे व गव्हाणकर यांच्या कलापथकांनी ही परिषद खूपच गाजवली. ही नावे जनतेपुढे खऱ्या अर्थाने प्रथम आली याच परिषदेमुळे. कामगार क्रांतीची अनेक गाणी त्यांनी गायली. उंच शरीरयष्टी, उभा लांबट चेहरा, डोक्यावरचे छपरासारखे केस, पाणीदार डोळे, लांबसडक हात आणि एकूण देहबोलीतून जाणवणारी उत्कटता आणि कळकळ असे अमर शेख यांचे व्यक्तिमत्त्व कोणावरही छाप पाडेल असेच होते. डफावर थाप पडली आणि बुलंद आवाजातले त्यांचे गाणे सुरू झाले की श्रोत्यांच्या अंगावर अगदी रोमांच फुलत. ही आग भुकेची जळते आमुच्या पोटी, मागतो खावया एकच आम्ही रोटी! हे गीत आपल्या दर्दभन्या पण पहाडी आवाजात त्यांनी गायले तेव्हा सगळी परिषद केवळ मंत्रमुग्ध झाली होती. एकाच वेळी डोळे भिजवणारे आणि मने पेटवणारे ते सूर होते. अण्णा भाऊ (भाऊ हे त्यांच्या वडिलांचे नाव) साठे यांचे व्यक्तिमत्त्व अगदी लाल ताऱ्याची साथ... १३५