पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/१३४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

खूप महत्त्व होते. इथल्या सेलमध्ये भाई प्रभाकर बर्डे यांच्या भगिनी विमलताई बर्डे, विमलताईंची मैत्रीण ज्योती जयकर व भाऊसाहेब असे तिघे जण होते. युनियनच्या ऑफिसातच तिघे बसत. पुढे विमलताई बर्डे या मुंबईला शिक्षणखात्यात मोठ्या अधिकारी बनल्या; ज्योती जयकरांनी शाहीर अमर शेख यांच्याबरोबर विवाह केला. या सर्व कामांमध्ये रावसाहेबांचा पूर्ण सहभाग असायचा. बेचाळीसच्या आंदोलनातही त्यांनी भाग घेतला होताच; पण त्यावेळेपेक्षा आताचा सहभाग अधिक विचारपूर्वक होता. एकतर वयही थोडे वाढले होते आणि अनेक अनुभवांतून गेल्यामुळे विचार व वागणेही अधिक परिपक्व बनले होते. रावसाहेब कम्युनिस्ट बनले तो कालखंड आणि शिंदे बोर्डिंग सुरू झाले तो कालखंड साधारण एकच होता. बोर्डिंगमधल्या सर्व मुलांची रावसाहेबांवर पूर्ण श्रद्धा होती; ती मुलेही त्यांच्या पाठोपाठ कम्युनिस्ट बनली. कम्युनिस्ट पक्षाचा संगमनेर तालुक्यातला कोणताच कार्यक्रम त्यावेळी बोर्डिंगमधील मुलांच्या सहभागाविना होत नसे. त्यामुळे त्यांची अर्थातच शाळेला दांडी असायची. दुसऱ्या दिवशी त्यांना वर्गात उभे करून शिक्षक जाब विचारत. अशा वेळी "आजी वारल्यामुळे शाळेत येता आलं नाही" ही सबब सांगायचे रावसाहेबांनीच पढवून ठेवलेले असायचे. अर्थात खरे कारण शिक्षकही जाणून असत ! नंतर शिक्षक आपापसात हास्यविनोद करताना म्हणत, "बोर्डिंगमधल्या विद्यार्थ्यांच्या आज्या भलत्याच संघटित दिसतात! सगळ्या एकाच दिवशी (आणि त्याही वारंवार ) मरतात!" पुढे पुढे "आज कोण-कोण गैरहजर आहेत?" असे विचारण्याऐवजी 'आज कुणा कुणाच्या आज्या वारल्या?” असे शिक्षक विचारत, तेव्हा वर्गात एकच हशा पिके! " (6 News and Views from Soviet Union या चक्रमुद्रित (सायक्लोस्टाइल्ड) नियतकालिकाचे मराठीत भाषांतर करून रावसाहेब गुप्तपणे ते बोर्डिंगमध्ये पाठवत; मग त्याच्या हस्तलिखित प्रती करून विद्यार्थी त्याचे व्यापक वितरण करत. त्या काळातली रावसाहेबांच्या पक्षकार्यातील सर्वांत महत्त्वाची घटना म्हणजे कल्याणजवळ टिटवाळा येथे १९४५च्या जानेवारीत भरलेले महाराष्ट्र प्रांतिक किसान सभेचे पहिले अधिवेशन किसान परिषद म्हणूनही या अधिवेशनाचा उल्लेख होतो. यात सर्वाधिक पुढाकार शामराव व गोदूताई परुळेकर या झुंजार कम्युनिस्ट जोडप्याचा होता. शामराव किसान सभेचे अध्यक्ष होते. संगमनेरहून भाऊसाहेब, धर्मा पोखरकर, नारायणराव नेहे, भीमाशंकर कानवडे आणि रावसाहेब अजुनी चालतोची वाट... १३४