पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/१३३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

विचारात घेऊन मुख्यमंत्री बाळासाहेब खेरे यांनी त्यांचा मंत्रिमंडळात लगेच समावेशही केला होता. त्याच वर्षी नामवंत अर्थतज्ज्ञ प्रा. धनंजयराव गाडगीळ यांची मुंबई प्रांतिक सहकारी बँकेच्या संचालकपदी निवड झाली होती व शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणींची त्यांना पूर्ण कल्पना होती. वाजवी दराने शेतकऱ्यांना कर्जपुरवठा करणारी एखादी यंत्रणा उभारणे या सगळ्या परिवर्तनाच्या लाटेत अशक्य नव्हते; किंबहुना तशा यंत्रणेची सुरुवात झालेलीच होती. पण तरुण मनांना विधायकतेपेक्षा संघर्षाची वाट कदाचित अधिक आकर्षक वाटली असावी. सावकारांच्या शोषणामुळेच शेतकरी गरीब आहे व सावकारांचा नायनाट केल्याशिवाय शेतकरी सुखी होणार नाही ही कम्युनिस्ट विचारसरणी या तरुणांना खूपच भावली. हे सावकारच स्थानिक पातळीवर खूपदा काँग्रेसचे नेते असत व त्यात बरेचसे ब्राह्मण वा अन्य उच्चवर्णीय असत. त्यामुळे 'काँग्रेस ही शेटजी- भटजींची' ही कम्युनिस्टांची मांडणी खूप तरुणांना पटकन पटायची. याउलट कम्युनिस्टांचे राज्य म्हणजे शोषितांचे व गरिबांचे राज्य या विचाराने ही तरुण मने पुरती झपाटली गेली होती. रावसाहेब, भाऊसाहेब व धर्मा त्यावेळी संगमनेरमध्येच शिकत असल्याने कम्युनिस्ट पक्षाचे कामही त्यांनी आधी संगमनेरमध्येच सुरू केले. कम्युनिस्ट पक्षाचे बहुतेक जुने नेते शहरी भागातले असल्यामुळे त्यांचा भर कामगार संघटनांवर होता; शेतकऱ्यांवर नव्हे. संगमनेर-अकोले परिसरात अनेक विडी कारखाने होते; किंबहुना दुसरा कुठलाच उद्योग त्या भागात नव्हता. तो दुष्काळी भाग असल्याने शेतीवर संसार चालणे अशक्यच होते. त्यामुळे घरची एक व्यक्तीतरी विडी वळण्याचे काम करत असे. साहजिकच संगमनेरमधील कम्युनिस्ट चळवळीची सुरुवात विडी कामगारांची युनियन बांधण्यापासून झाली. भाऊसाहेबांचे एक मित्र रामभाऊ नागरे स्वतः विडी कामगार होते. ते युनियनचे अध्यक्ष तर भाऊसाहेब सेक्रेटरी म्हणून निवडले गेले. थोड्या दिवसांतच मजुरी वाढवून मिळावी म्हणून युनियनने संप पुकारला. पण मालकांवर संपाचा काहीच परिणाम झाला नाही. कामगारांचे हातावर पोट असल्यामुळे जास्त दिवस संपावर राहणे कामगारांना शक्यही नव्हते; तरीही त्यांनी महिनाभर संप लढवला. पण मालकांनी दाद दिली नाही. शेवटी युनियनला संप मागे घ्यावा लागला. युनियनच्या कामाचा एक फायदा असा झाला, की दैनंदिन स्वरूपात पक्षाचे काही काम सुरू झाले व त्यातूनच पक्षाचा संगमनेर 'सेल' तयार झाला. सेल म्हणजे पक्षाचा छोटा स्थानिक गट. अशा सेलना कम्युनिस्ट पक्षाच्या बांधणीत लाल ताऱ्याची साथ... १३३