पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/१३२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

आपला सगळा वेळ याच कामासाठी देऊ लागले. साम्यवादी (कम्युनिस्ट) विचारसरणीबद्दल या तरुण क्रांतिकारकांना वाटणाऱ्या आकर्षणाची कारणे तशी स्वाभाविक होती. ते तरुण ग्रामीण भागातले होते; त्यातही दुर्गम आणि दुष्काळी अशा भागातले. दारिद्र्यामुळे बहुतेकांची शेते सावकारांकडे गहाण पडलेली. लोकांच्या आर्थिक व्यवहारांवर या सावकारशाहीचा मोठाच पगडा होता. बहुसंख्य समाज हा निरक्षर होता. त्यामुळे खोट्यानाट्या कागदपत्रांवर शेतकऱ्यांचे अंगठे घेणे व त्यांना लुबाडणे हे सर्रास व्हायचे. 'सावकारी पाश' सारख्या चित्रपटांतून याचे उत्तम चित्रण झाले आहे. सर डॅनियल हॅमिल्टन हे एक मोठे स्कॉटिश उद्योगपती. मॅकिनॉन अँड मॅकेन्झी या कंपनीचे मालक. ते बंगालमध्ये स्थायिक झाले होते. स्वत: ९००० एकर जमीन विकत घेऊन सुंदरबन विभागात त्यांनी सहकारी शेतीचे प्रयोग केले होते. भारतातल्या ग्रामीण गरिबीचा त्यांचा दांडगा अभ्यास होता. महात्मा गांधी व रवीन्द्रनाथ टागोर दोघेही त्यांना खूप मानत. भारतातील सावकारी पाशांबद्दल त्यांनी म्हटले होते : " हा देश सावकारांच्या कचाट्यात सापडला आहे. कर्जबाजारीपणामुळे शेती जखडलेली आहे. व्याजाच्या अतिरिक्त दरामुळे आत्यंतिक निर्दयपणा सावकार दाखवतात. त्यामुळे रयतेची चरबीच शोषली जाते आणि तिला दारिद्र्य व गुलामगिरी यांतच खितपत पडावे लागते. " तत्कालीन सरकारने नेमलेल्या फॅमिन कमिशननेदेखील सावकारांकडून होणाऱ्या शेतकऱ्यांच्या शोषणाची दखल घेतली होती. पण त्या परिस्थितीवर तोडगा निघावा म्हणून अनेक विधायक प्रयत्नही सुरू झाले होते याचीही नोंद घ्यायला हवी. १८८२च्या सुमारासच सर विलियम वेडरबर्न व न्या. महादेव गोविंद रानडे यांनी शेतकरी बँक काढण्यासाठी एक नवीन योजना सुचवली होती. देशाच्या बहुतेक मोठ्या शहरांमध्ये त्यावेळेपावेतो व्यावसायिक बँकांचे जाळे पसरू लागले होते व त्याचा विस्तार ग्रामीण भागातही होणे अवघड असले तरी अशक्य नव्हते. मुंबई प्रांतिक सहकारी बँकेच्या (नंतरच्या महाराष्ट्र सहकारी बँकेच्या) शाखा राज्यातील इतर जिल्ह्यांप्रमाणे अहमदनगर जिल्ह्यातही बेलापूर स्टेशन, संगमनेर, राहुरी, अहमदनगर व कोपरगाव येथे होत्या. या बँकेचे कार्यकारी संचालक भारतीय सहकारी चळवळीचे अध्वर्यू वैकुंठभाई मेहता यांनी तब्बल ३४ वर्षे या बँकेची सेवा केली होती. पुढे " तुम्ही ही बँकेची नोकरी सोडा आणि मुंबई प्रांताच्या सरकारात अर्थ व सहकार खात्याचे मंत्री म्हणून काम करा” असे खुद्द महात्मा गांधी यांनी १९४६ साली त्यांना सुचवले होते व गांधीजींची इच्छा अजुनी चालतोची वाट... १३२