पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/१३१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अण्णासाहेब शिंदे व त्यांचे सहकारी हेही या लाल लाटेला अपवाद नव्हते. तुरुंगात असतानाच कम्युनिस्ट तत्त्वज्ञानाने त्यांना पुरते भारून टाकले. - अण्णासाहेबांचा स्वभाव मूलत: व्यासंगी आणि चिंतनपर होता. तुरुंगात असताना आपला सर्व वेळ ते गंभीर स्वरूपाचे वाचन व त्यावरील चर्चा यांसाठी देत. तसे वाचनाचे वेड त्यांना पूर्वीपासून होतेच. वाचलेल्या पुस्तकांवर टिपणे काढणे, त्या टिपणांच्या आधारे इतर कार्यकर्त्यांसमोर व्याख्याने देणे, स्टडी सर्कल्स आयोजित करणे, रोजच्या वर्तमानपत्रांतील महत्त्वाच्या बातम्यांचे कार्यकर्त्यांसमोर विश्लेषण करणे हा त्यांचा रोजचाच दिनक्रम होता. त्यामुळे वाचलेले मनात पक्के बसायचे; त्याचा नेमका संदर्भही लक्षात यायचा. 'कम्युनिस्ट मॅनिफेस्टो' ची त्यांनी पारायणे केली होती. रजनी पामदत्त यांचे 'सोशॅलिझम टू फॅसिझम' किंवा अमेरिकन पत्रकार एडगर स्नो यांचे चीनभेटीवर आधारित 'रेड स्टार ओव्हर चायना' ही पुस्तकेही खूप वाचली गेली. या सगळ्या चर्चेचा चिंतनाचा परिणाम म्हणजे अण्णाभाऊ, तसेच अकोले - संगमनेर परिसरातील सहबंदी बुवासाहेब नवले, भाऊसाहेब थोरात, पांडुरंग भांगरे, पी. पी. जोशी, चंद्रभान आठरे पाटील वगैरे मंडळी कम्युनिस्ट विचारधारेने खूप प्रभावित झाली. १९४४च्या उत्तरार्धात जेव्हा हे क्रांतिकारक तुरुंगातून सुटले तेव्हा ते पूर्णवेळ कम्युनिस्ट कार्यकर्ते ( फुल- टायमर) म्हणूनच काम करू लागले. नगर जिल्ह्याच्या उत्तर भागात अण्णाभाऊंचे नेतृत्व होते तर दक्षिण भागात चंद्रभान आठरे पाटलांचे नेतृत्व होते. याशिवाय पूर्वीपासूनच कम्युनिस्ट असलेली कॉ. रामभाऊ नागरे, कॉ. भैय्यासाहेब कुलकर्णी, कॉ. बाबा गोसावी, कॉ. डी. बी. कुलकर्णी यांसारखी मंडळी कार्यरत होतीच. त्यांना या तरुण क्रांतिकारकांची साथ मिळाल्यावर नगर जिल्ह्यात कम्युनिस्ट पक्षाचे काम बरेच वाढले. नगर जिल्हा आता 'लाल' झाला अशी चर्चा वृत्तपत्रांतून होऊ लागली. अण्णाभाऊ जेलमध्ये असतानाही त्यांचा आणि रावसाहेबांचा पत्रव्यवहार नियमित चालू होता; पत्रांतून विस्तृत चर्चाही व्हायची. बंधूंनी सुचवलेली पुस्तकेही रावसाहेब आवर्जून वाचत असत. अण्णाभाऊ तुरुंगातून सुटल्यानंतर झालेल्या प्रत्यक्ष भेटचर्चांमध्ये त्या विचारमंथनाला उजाळा मिळत गेला आणि लौकरच रावसाहेबांनीही कम्युनिस्ट विचारसरणी स्वीकारली. संगमनेरला शिकत असताना भाऊसाहेब, धर्मा व रावसाहेब एकाच वर्गात शिकत होते, दिवसाचा बहुतेक वेळ एकत्रच असायचे. कम्युनिस्ट पक्ष आणि त्याचीच एक ग्रामीण आघाडी 'किसान सभा' यांच्या प्रचारासाठी हे त्रिकुट खेडोपाडी फिरू लागले; शिक्षणाव्यतिरिक्तचा लाल ताऱ्याची साथ... १३१