पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/१३०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

तत्त्वज्ञान पूर्णत: ऐहिक ( materialistic) होते. त्याच्या मते धर्म ही बहुजनसमाजासाठीची अफूची गोळी होती. ( "Religion is opium of the masses.") "जीवन हे अंत: चेतनेनुसार घडत नाही, तर जीवनानुसार अंत: चेतना घडते," ("Life is not determined by consciousness, but consciousness is determined by life.") असेही मार्क्सने लिहिले आहे. या तत्त्वज्ञानाने जगात प्रचंड खळबळ उडाली. एखाद्याच्या लेखणीचा जगात इतका प्रभाव पडल्याचे दुसरे उदाहरण सापडणे अवघड आहे. याच तत्त्वज्ञानाच्या आधारावर व्हलॅदिमिर (Vladimir) लेनिनने आपली कम्युनिस्ट पार्टी उभारली आणि पुढे १९१७ साली रशियात झारची राजसत्ता संपुष्टात आणली. "कम्युनिझम म्हणजे काय ? " असा प्रश्न विचारला असता लेनिनने "कार्ल मार्क्स अधिक इलेक्ट्रिसिटी" हे आपली भूमिका सुस्पष्ट करणारे मार्मिक उत्तर दिले होते. लेनिनसारख्या समर्थकांमुळे एक प्रबळ सत्ताधिष्ठित राजकीय विचारप्रणाली बनण्याचे भाग्य मार्क्सवादाला लाभले. वेगवेगळ्या राष्ट्रव्यापी पंचवार्षिक योजना आखून, नियोजनबद्ध विकास (Planned development) हे सूत्र पकडून, शेतीप्रधान रशियाचे उद्योगप्रधान समाजात रूपांतर करायचा एक अवाढव्य कार्यक्रम त्याने आणि त्याच्यानंतर जोसेफ स्टॅलिनने हाती घेतला. एकीकडे साम्राज्यवादी व भांडवलवादी ब्रिटनच्या विरोधात रशिया उभा होता, तर दुसरीकडे जुनाट, शेतीधिष्ठित, बुरसटलेल्या अर्थव्यवस्थेच्या विरोधात. नेमके हेच दोन प्रमुख शत्रू भारतासारख्या परतंत्र व गरीब देशापुढे होते. 'समानशीले व्यसनेषु सख्यम्' या न्यायाने अगणित बुद्धिजीवी भारतीय तरुणांमध्ये त्यावेळी रशियन प्रयोगाविषयी कमालीचे आकर्षण होते. एका अत्यंत किडलेल्या आर्थिक व सामाजिक व्यवस्थेचे आधुनिकीकरण रशियात होत होते. जे परिवर्तन पाश्चात्त्य देशांत दोनशे- वर्षांत झाले तेच परिवर्तन मागासलेल्या रशियन राष्ट्रात अवघ्या पंचवीस-तीस वर्षांतच आणण्याचे रशियन नेत्यांचे स्वप्न होते. मानवी इतिहासात समाजपरिवर्तनाचा प्रयोग इतक्या मोठ्या प्रमाणावर पूर्वी कधीही केला गेला नव्हता. या प्रयोगाची भव्यता कुठल्याही तरुण मनाला भुरळ पाडणारी होती, जिंकून घेणारी होती. अशा परिस्थितीत भारतातील वा इतरही बहुतेक परतंत्र देशांतील संवेदनाक्षम नेते कम्युनिझमपासून वैचारिकदृष्ट्या तरी फार वेळ दूर राहूच शकले नसते. जवाहरलाल नेहरू - अब्दुल गमाल नासर-सुकार्नोपासून रॉबर्ट मुगाबे-ज्युलियस न्येरेरे- जोमो केन्याटापर्यंत अगणित आफ्रो-एशियन नेते त्याकाळात कम्युनिझमकडे आकर्षित झाले होते. १९४२च्या आंदोलनात नाशिक रोड जेलमध्ये डांबले गेलेले अजुनी चालतोची वाट... १३०