पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/१२९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

७ लाल ताऱ्याची साथ १८६७ साली कार्ल मार्क्सच्या द कॅपिटल या क्रांतिकारक ग्रंथाचा पहिला भाग इंग्लंडमध्ये प्रकाशित झाला. ( या ग्रंथाचे पुढचे दोन भाग १८८३ साली त्याचा मृत्यू झाल्यानंतर प्रकाशित झाले.) यापूर्वी वीस वर्षे मार्क्स आणि फ्रेडरिक एंगल्स या दोघांनी मिळून १८४७ साली द कम्युनिस्ट मॅनिफेस्टो हा छोटेखानी जाहीरनामा प्रसिद्ध केला होता. ते दोघेही १८४४ सालापासून 'द कम्युनिस्ट लीग' या युरोपातील निर्वासितांसाठी काम करणाऱ्या एका जर्मन संस्थेचे सदस्य होते. 'द कम्युनिस्ट मॅनिफेस्टो' मधील मांडणीला विस्तृत अर्थशास्त्रीय व समाजशास्त्रीय बैठक पुरवण्याचे काम 'द कॅपिटल' या प्रचंड ग्रंथाने केले होते. एकूण मार्क्सवाद समजून घेणे बऱ्यापैकी क्लिष्ट आहे; पण त्याच्या काही मूलभूत तत्त्वांना आंतरराष्ट्रीय स्तरावर बरीच व्यापक मान्यता मिळाली. 6 उत्पादनाच्या प्रक्रियेनुसार (प्रॉडक्शन प्रोसेसनुसार) समाजजीवन घडत जाते; भांडवलदार व कामगार हे समाजातील दोन प्रमुख वर्ग आहेत (आहे-रे आणि नाही रे, Have आणि Have nots); त्यांच्यातील संघर्ष (Class War) हा अटळ आहे; आपापसांतील आत्यंतिक स्पर्धेमुळे भांडवलशाही एक दिवस नष्ट होईल आणि जगात कामगारांचे राज्य अस्तित्वात येईल ही मार्क्सवादातील काही प्रमुख तत्त्वे. "जगातल्या कामगारांनो, एक व्हा ! गमावण्याजोगे तुमच्या साखळदंडांशिवाय तुमच्याकडे आहेच काय!" ("Workers of the world unite! You have nothing to loose but your chains !") हे त्याचे आवाहन भारून टाकणारे होते. मार्क्सवादाचे आवाहन हे मुख्यतः हृदयाला होते, खिशाला नव्हते. मार्क्सवादात काव्य होते, 'धुक्यातून लाल तायाकडे' नेण्याचे आमिष होते, एक भारावून टाकणारा रोमान्स होता. ईश्वर, आत्मा अशा संकल्पनांवर मार्क्सचा अजिबात विश्वास नव्हता. त्याचे लाल ताऱ्याची साथ... १२९