पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/१२८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

'त्यावेळी ती परदेशी जायची संधी आपण घेतली असती तर जीवनाला कोणती दिशा मिळाली असती ?" हा प्रश्न पुढे उतारवयात मात्र त्यांच्या मनात कधीकधी उभा राहिला होता. परीक्षेनंतरचा अहमदनगरमधला दुसरा दिवस उजाडला. संध्याकाळी रावसाहेब कोणाशीतरी गप्पा मारत बसले होते. कम्युनिस्ट पक्षावर सरकारने बंदी घातल्याची बातमी नुकतीच कानावर आली होती. तेवढ्यात त्यांचे एक कम्युनिस्ट विचारांचे सहप्रवासी सोनावळे तिथे आले. कलेक्टर ऑफिसमध्ये ते नोकरीला होते. रावसाहेबांना एका बाजूला घेऊन बसक्या आवाजात ते म्हणाले, 3 "तुम्हांला पकडण्याचं वॉरंट मी स्वतः आत्ताच टाईप केलं. त्यावर कलेक्टरची सहीदेखील झाली आहे. डी.एस.पी. कडे आता ते वॉरंट कार्यवाहीसाठी गेलं आहे. उद्या पहाटेच छापा घालून तुम्हांला पकडायचं ठरलं आहे." रावसाहेब तडक उठले. तिथले एक कम्युनिस्ट स्नेही कॉम्रेड पी. पी. जोशी यांच्या खोलीवर गेले. घाईघाईने वेषांतर करून, नेहमीचा टोपी-पायजमा टाकून व धोतर - फेटा बांधून लगेच संध्याकाळच्याच बसने संगमनेरला गेले. तिथे शिंदे बोर्डिंगवर गेले आणि शेजारच्या शेतातल्या पिकामध्ये जाऊन लपले. रावसाहेब आता अहमदनगर कॉलेजचे इंटर आर्ट्सचे एक विद्यार्थी नव्हते, तर ज्याच्याविरुद्ध वॉरंट निघाले आहे आणि पोलीस ज्याचा शोध घेत आहेत असे एक भूमिगत कम्युनिस्ट होते. अजुनी चालतोची वाट... १२८