पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/१२७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

ऐकणार नाही. " अर्थात असा माफीनामा देणेही रावसाहेबांना शक्य नव्हते. शेवटी नाइलाजास्तव त्यांनी वसतिगृह सोडायचा निर्णय घेतला. पुण्याला भीमाशंकर कानवडे नावाचा त्यांचा एक मित्र फर्गसन कॉलेजच्या वसतिगृहात राहत होता. तो स्वतः कम्युनिस्ट विचारांचाच होता व त्याची आर्थिक स्थिती चांगली होती. त्याचे काका पंढरीनाथ कानवडे अहमदनगरमध्ये प्रसिद्ध वकील होते. ते सढळ हाताने त्याला पैसे पाठवत. भीमाशंकरने रावसाहेबांची पुण्यातल्या आपल्या खोलीत राहायची व मेसमध्ये जेवायचीही सोय केली. मार्चमध्ये ठरल्याप्रमाणे इंटरची परीक्षा झाली. परीक्षेला पुणे हेच केंद्र होते. पेपर्स बरे गेले. परीक्षा संपल्यावर दुसऱ्याच दिवशी रावसाहेब नगरला गेले. सर्वप्रथम हिवाळेसरांना जाऊन भेटले. त्यांचे आभार मानले. पेपर्स बरे गेल्याचेही सांगितले. "हे बघ, ही चळवळ वगैरे सोड आणि अभ्यासावरच सगळं लक्ष केंद्रित कर. मी तुला पुढील शिक्षणासाठी अमेरिकेला पाठवतो. तुझा सगळा खर्च भागेल एवढी स्कॉलरशिपही मिळवून देतो, " हिवाळेसर म्हणाले. उच्च शिक्षणासाठी अमेरिकेला पाठवायची ऑफर मागेही एकदा त्यांनी रावसाहेबांना दिली होती. तसे पाहिले तर हिवाळेसरांना रावसाहेब आवडायचे. त्यांचा बाणेदारपणा, धाडसी स्वभाव आणि मुख्य म्हणजे ध्येयवाद यांचे हिवाळेसरांना खूप अप्रूप होते. कारण ते स्वतः ही खूप ध्येयवादी होते; त्याशिवाय त्यांच्यासारखा हार्वर्डहून पीएच. डी. केलेला माणूस अहमदनगरसारख्या ठिकाणी येऊन खास गोरगरिबांच्या मुलांसाठी म्हणून असे एखादे कॉलेज सुरू करायच्या खटाटोपात पडलाच नसता. त्यांच्या बुद्धिमत्तेला अधिक वाव देणारी इतर अनेक क्षेत्रे त्यांना सहज मिळाली असती. एका ध्येय 'माणसाला दुसऱ्या ध्येयवादी माणसाची, त्यांचे मार्ग वेगवेगळे असले तरी, अंतर्यामी कुठेतरी कदर ही असतेच. रावसाहेबांनाही हिवाळेसरांबद्दल खूप आदर होता. अडचण इतकीच होती, की त्यांच्यासारख्या धर्मप्रसारक मिशनऱ्याचा ध्येयवाद आणि रावसाहेबांसारख्या देव-धर्म अजिबातच न मानणाऱ्या कम्युनिस्टाचा ध्येयवाद यांची कुंडली जुळणे अशक्य होते. हिवाळेसरांचे आभार मानून रावसाहेबांनी त्यांचा निरोप घेतला. त्यावेळी कम्युनिस्ट विचारांचा पगडा त्यांच्या मनावर इतका जबरदस्त होता, की अमेरिकेला जाऊन उच्चशिक्षण घ्यायच्या संधीचे त्यांच्या लेखी काडीचेही मोल नव्हते. त्यांचे अमेरिकेविषयीचे मत खूपच वाईट होते. त्या भांडवलदारी देशातले शिक्षण आपल्याला काय उपयोगी असणार आहे हाही विचार त्यांच्या मनात होता. महाविद्यालयातले दिवस... १२७