पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/१२५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

हिवाळेसर हे करत. विद्यार्थिप्रेमाचा हा एक हृद्य आविष्कार होता. रावसाहेब अहमदनगर कॉलेजात शिकत असतानाच तीन ऐतिहासिक घटना घडल्या होत्या. एकतर १५ ऑगस्ट रोजी देशाला स्वातंत्र्य मिळाले होते. दुसरे म्हणजे त्याचवेळी देशाची रक्तलांच्छित फाळणी झाली होती. आणि तिसरे म्हणजे ३० जानेवारी १९४८ ला नवी दिल्ली येथे महात्मा गांधींची हत्या झाली होती. पण या तिन्ही घटनांविषयीच्या त्यांच्या प्रतिक्रिया विस्ताराने कुठे त्यांनी नोंदवल्याचे आढळत नाही. याबाबतचे अधिक विश्लेषण पुढच्या प्रकरणात येणार आहे. गांधीहत्येच्या दुर्दैवी घटनेनंतर महाराष्ट्रात अनेक ठिकाणी दंगली व जाळपोळ यांचा आगडोंब उसळला. गांधीहत्येचा मोठा कट अहमदनगर येथे शिजला होता व त्यामुळे साहजिकच अहमदनगरलाही त्या दंगलींची बरीच झळ लागली होती. हिंदुत्ववादी मंडळींविरुद्ध सर्वसामान्य लोकांमध्ये प्रचंड रोष होता. बहुजनसमाज मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर उतरला होता. यावेळी अनेक ब्राह्मणांच्या घराला आगी लावण्यात आल्या. रावसाहेब त्यावेळी अहमदनगर कॉलेजातच शिकत होते. पण याही घटनेचे फारसे पडसाद त्यांच्या लेखनात कुठे आढळत नाहीत. रावसाहेबांच्या कम्युनिस्ट कारवाया त्यावेळी जोरात चालू होत्या, पण त्या हिवाळेसरांच्या दृष्टीस पडणार नाहीत याची खबरदारी रावसाहेब घेत होते. अर्थात अशा हालचाली फार काळ लपून राहणेही अशक्यच होते. एक दिवस ते अघटित घडलेच. कम्युनिस्ट पक्षाच्या ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशनचे काम त्यावेळी रावसाहेब करत होते. नुकतीच सरकारने फीवाढ जाहीर केली होती व त्याविरुद्ध आंदोलन करून शाळा-कॉलेजेस बंद पाडण्याचा कम्युनिस्टांचा कार्यक्रम होता. त्यानुसार रावसाहेब व त्यांच्या सहकाऱ्यांनी अहमदनगरमधील शाळा- - कॉलेजेस पाडली. हिवाळेसरांना हा वृत्तान्त कळल्यावर त्यांनी रावसाहेबांसह आठ-दहा विद्यार्थ्यांची नावे "यांनी ताबडतोब प्रिन्सिपॉलना त्यांच्या ऑफिसात येऊन भेटावे," अशा सूचनेसह नोटिस-बोर्डावर लावली. रावसाहेबांनी त्यांना भेटणे टाळले, पण बाकीचे सर्व सहकारी गेले व सपशेल माफी मागून मोकळे झाले. ही सगळी हकिकत रावसाहेबांच्या कानावर आली. "या घटनेत रावसाहेबांचा पुढाकार होता व त्यांच्याच नादाने आम्ही यात सामील झालो," असे त्यांनी प्रिन्सिपॉलना सांगितले होते. त्यामुळे प्रिन्सिपॉलना भेटणे आता अत्यावश्यक बनले. दुस-या दिवशी रावसाहेब प्रिन्सिपॉलांकडे गेले. आदल्या दिवशी माफी मागितलेल्या सर्व विद्यार्थ्यांना प्रिन्सिपॉलांनी मुद्दामहून आज परत बोलावून घेतले महाविद्यालयातले दिवस... १२५