पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/१२४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

होती. अभ्यासही काहीच झाला नव्हता. परीक्षेला न बसण्याची परवानगी त्यांनी हिवाळेसरांकडे मागितली. पण "परीक्षेला जरूर बस, मार्क कमी पडले तरी चालेल,” असे हिवाळेसरांचे मत पडले. आश्चर्य म्हणजे परीक्षा फारशी अवघड गेली नाही. त्यांचा लॉजिकचा व इंग्रजीचा पेपर तर सरांनी वर्गात सगळ्यांना दाखवला आणि "याचे चुलते आजारी असल्यामुळे याचा अभ्यास खूप बुडाला, पण तरीही याने इतके चांगले पेपर्स लिहिले आहेत," असे म्हणत रावसाहेबांची वर्गात जाहीर प्रशंसाही केली. रावसाहेबांना अर्थातच खूप आनंद झाला, पण त्याचबरोबर चुलते आजारी असल्याचे खोटेच कारण सांगून आपण आंध्रात गेलो व यात आपण सरांची फसवणूकच केली आहे, याची टोचणीही त्यांना खूप लागली. अहमदनगर कॉलेज त्यांना अपेक्षेपेक्षा जास्त आवडले. अगदी नवे कॉलेज असल्यामुळे व अमेरिकन मिशनऱ्यांचे संपूर्ण सहकार्य असल्यामुळे अनेक नवीनतम शैक्षणिक तंत्रांचा कॉलेजात अवलंब केला जात होता. रावसाहेब ज्या वर्गात होते त्या इंटर आर्ट्सच्या वर्गात फक्त पंचवीसच विद्यार्थी होते. त्यामुळे प्राध्यापकांचेही विद्यार्थ्यांवर व्यक्तिगत लक्ष असे. वसतिगृहात कोपरगावचे सूर्यभान मोरे हे त्यांचे रूममेट होते. पुढे वकील होऊन कोपरगावला त्यांनी प्रॅक्टिस सुरू केली. पुढे महाराष्ट्राचे कायदेमंत्री झालेले रामराव आदिकही त्याच वसतिगृहात राहत. ते प्रथम वर्षाला होते. हिवाळेसरांनी स्वत:ला पूर्णपणे कॉलेजसाठीच वाहून घेतले होते. प्रत्येक विद्यार्थ्याची सगळी माहिती त्यांनी प्रवेश देतानाच घेतलेली असे व ती त्यांच्या लक्षातही असे. लेक्चर चालू असतानाही कॉलेजच्या इमारतीच्या उभारणीसंबंधी एखादा मुद्दा सुचला तर ते वर्गातल्या सगळ्या मुलांना बरोबर घेऊन चक्क बाहेर येत, ांधकाम चाललेल्या जागी जात, आपली कल्पना समजावून सांगत आणि विद्यार्थ्यांच्याही सूचना विचारात घेत. हे कॉलेज 'आपलेच' आहे ही भावना त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांमध्ये होती. हिवाळेसरांच्या बंगल्यावरही रावसाहेबांना मुक्त प्रवेश असे. मोकळा वेळ असला, की खूपदा ते तिथे गप्पा मारायला जात. सरांच्या पत्नी आणि दोन मोठ्या मुली यांच्याशीही रावसाहेबांची चांगली मैत्री जुळली. हिवाळेसरांचा लाडका विद्यार्थी म्हणून सगळे त्यांना ओळखू लागले. हिवाळेसर लॉजिक शिकवत असत. त्यांचे लॉजिकचे पुस्तक ते रावसाहेबांकडेच ठेवायचे. त्यांचा तास असला की रावसाहेब पुस्तक त्यांना देत आणि तास संपला की हिवाळेसर ते पुस्तक रावसाहेबांकडे परत देत. हे पुस्तक रावसाहेबांकडे नसणार या जाणिवेतूनच अजुनी चालतोची वाट... १२४