पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/१२३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

त्यांनी रावसाहेबांना इथेच प्रवेश घ्यायचा आग्रह सुरू केला. "हे कॉलेज मी कशासाठी काढतो आहे? तुझ्यासारख्या इकडच्या भागातील विद्यार्थ्यांची इथेच सोय व्हावी म्हणूनच ना? मग इथे न येता तू तिथे लांब कोल्हापूरला कॉलेज कशाला जॉइन करतोस ?" - असा त्यांचा युक्तिवाद होता. कॉलेजप्रवेशाबरोबरच रावसाहेबांची वसतिगृहाची सोय करायचीही त्यांनी तयारी दर्शवली. रावसाहेब आता काहीशा संभ्रमात पडले. कोल्हापूर सोडतानाच सुट्टी संपल्यावर इंटर आर्ट्ससाठी कोल्हापूरला परतायचे त्यांनी ठरवले होते व कोल्हापूर त्यांना आवडलेही होते. पण विचारान्ती अहमदनगरलाच प्रवेश घेण्यातले अनेक फायदे त्यांना दिसू लागले. एकतर कोल्हापूरला कॉ. ओलकर सोडल्यास त्यांचे व्यक्तिगत स्नेही असे कोणीच नव्हते आणि ओलकरही समवयस्क विद्यार्थी नव्हते, ते एक अनुभवी कामगारनेते होते; भाऊसाहेब किंवा धर्मा यांच्याशी रावसाहेबांची अधिक स्वाभाविक जवळीक होती. दुसरे म्हणजे पाडळीतले कुटुंब, संगमनेरचे शिंदे बोर्डिंग, इतर मित्र-नातेवाईक या सर्वांशीच इथे राहून संबंध ठेवणे अधिक सोयीचे होते. आणि तिसरे म्हणजे कोल्हापुरात कम्युनिस्ट चळवळ फारशी नव्हती, ओलकरांसारखी काही मूठभर माणसे आपापल्या क्षेत्रात तेवढे पार्टीचे काम करायची. याउलट अहमदनगर जिल्ह्यात मात्र कम्युनिस्ट चळवळ खूपच फोफावली होती; सगळ्या जिल्ह्यालाच 'लाल जिल्हा' असे म्हटले जायचे. साहजिकच अहमदनगरला राहून कम्युनिस्ट चळवळीत काम करायची मोठीच संधी त्यांना पुन्हा एकदा मिळणार होती. मुख्यत: या तीन कारणांमुळे रावसाहेबांनी अहमदनगरच्या या कॉलेजात प्रवेश घेतला. अपेक्षेप्रमाणे हेबांचा चळवळीतला सहभाग इथे एकदम वाढला. कॉलेज सुरू होऊन जेमतेम एक-दोन महिने होताहेत एवढ्यात त्यांना चळवळीच्या कामासाठी आंध्रमध्ये जावे लागले. कुठल्याही ख्रिश्चन मिशनचा कम्युनिस्ट चळवळीला विरोध असणार हे उघडच होते; कारण 'धर्म ही अफूची गोळी आहे' हे मार्क्सचे तत्त्वज्ञान कुठल्याही मिशन-याला पटणे अशक्यच होते. त्यामुळे आपली चळवळ हिवाळेसरांपासून नेहमीच लपवून ठेवावी लागेल याची रावसाहेबांना कल्पना होती. आता आंध्रमध्ये जातानाही "माझे एक चुलते खूप आजारी आहेत. त्यांना उपचारासाठी नाशिकला नेलं आहे. त्यांच्या मदतीसाठी आत्ता तिथे जाणं अत्यावश्यक आहे," अशी खोटीच सबब हिवाळेसरांना सांगून ते गेले होते. तिथे गेल्यामुळे पंधरा-वीस दिवस कॉलेज बुडले होते; तिमाही परीक्षा अगदी तोंडावर आली महाविद्यालयातले दिवस... १२३