पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/१२२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१९४७मध्येच सुरू झालेल्या अहमदनगर कॉलेज या एका नव्या कॉलेजात प्रवेश घ्यायचे त्यांनी ठरवले होते. दोघेही मित्र त्यासाठी एकत्रच कॉलेजात गेले. समोर मुलांच्या घोळक्यात प्रिन्सिपॉल स्वतःच बसले होते आणि कुठच्याही प्रकारचा मोठेपणा न दाखवता स्वतःच विद्यार्थ्यांना आपल्या इंग्रजी-मराठी अशा संमिश्र भाषेत सर्व मार्गदर्शन करत होते. मोठे दुर्मिळ दृश्य होते ते. विद्यार्थ्यांमध्ये इतके समरस होणारे प्रिन्सिपॉल शोधूनही कुठे सापडले नसते. प्रिन्सिपॉल भास्कर पांडुरंग (ऊर्फ बी. पी.) हिवाळे हे एक खूप विलोभनीय व्यक्तिमत्त्व होते. 'बाप्पा' म्हणूनच सगळे त्यांना हाक मारीत आणि गोरगरिबांचे ते खरोखरच बाप्पा होते. ते स्वतः ख्रिश्चन मिशनरी होते व अत्यंत गरीब अशा एका दलित कुटुंबात त्यांचा जन्म झाला होता. परिस्थितीचे चटके सहन करतच त्यांनी शिक्षण पूर्ण केले होते. पुढे काही ख्रिश्चन मिशन यांनी मदत केल्यामुळेच त्यांना अमेरिकेत जाऊन उच्चशिक्षण घेता आले होते. अमेरिकेतल्या प्रख्यात हार्वर्ड विद्यापीठातून त्यांनी पीएच.डी. केली होती. त्यानंतर एका मिशनतर्फेच चालवण्यात येणाऱ्या मुंबईतील विल्सन कॉलेजात त्यांनी तत्त्वज्ञान विषय शिकवला होता. (या कॉलेजात अण्णाभाऊंनीही आपले काही कॉलेजशिक्षण घेतले होते.) चर्चमध्ये ते रेव्हरंड हे उच्चपद भूषवीत होते. १९४७ सालच्या सुरुवातीला मुंबईतील अमेरिकन मराठी मिशनच्या वतीने त्यांनीच अहमदनगर जिल्ह्यातील या पहिल्याच कॉलेजची स्थापना केली होती. अहमदनगरच्या मध्यावरच बरीच मोठी जमीन मिशनने कॉलेजसाठी उपलब्ध करून दिली होती. इमारतींची उभारणी अजून चालूच होती. पहिल्या वर्षाचे वर्ग गेल्या शैक्षणिक वर्षात ३०० विद्यार्थ्यांसह सुरू झाले होते व यंदा दुसऱ्या वर्षाचे वर्ग सुरू होणार होते. प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्यांमध्ये शिक्षण मध्येच सोडून नोकरीधंद्याला लागलेले पण आता पुढे शिकू पाहणारेही बरेच होते. आर्थिक अडचण प्रत्येक जणच सांगायचा; कधी खरी, तर कधी खोटी. पण हिवाळेसर सहसा कोणाला नाराज करत नसत. एकतर त्यांचा कनवाळू स्वभाव व दुसरे म्हणजे कॉलेज मिशनचे होते; नफ्यातोट्याकडे लक्ष न देता जास्तीत जास्त मुलांना शिक्षण द्यायचे, हे त्यांचे धोरण होते. विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचे काम करता करताच एकीकडे ते इतर स्टाफच्या नेमणुकीविषयी, बांधकामाविषयी, फर्निचरच्या तरतुदीविषयी वेगवेगळ्या संबंधित लोकांशी ही बोलत होते. कॉलेजच्या उभारणीशी ते अगदी पूर्णतः एकरूप झाले होते. जास्तीत जास्त सवलत देऊन त्यांनी धर्मा पोखरकरांचा प्रवेश मार्गी लावला व मग रावसाहेबांकडे आपला मोर्चा वळवला. तुम्ही कोण, कुठले वगैरे चौकशी सुरू केली. रावसाहेब कोल्हापूरला इंटर आर्ट्ससाठी चालले आहेत हे ऐकल्याबरोबर अजुनी चालतोची वाट... १२२