पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/१२१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

व आपल्या निबंधाचे प्रकाशनोत्तर श्रेय आपल्याला नाही मिळाले, तरी एखाद्या विषयाचा व्यासंग आपल्या हातून होणे हेही महत्त्वाचे आहे. हे सर्व विसरून जायचे आणि पुन्हा कॉलेज अभ्यासाला सुरुवात करायची असे रावसाहेबांनी ठरवले; त्या प्रकरणावर त्यांनी पडदा पाडला. बोर्डिंगसाठी मदत गोळा करण्यात लाभार्थी मुलांनीदेखील आपला वाटा उचलायला हवा हे तत्त्व इतर बोर्डिंग्जप्रमाणे याही बोर्डिंगमध्ये पाळले जाई. बोर्डिंगचे व्यवस्थापक हिंदूराव पारखे आणि आनंदराव चव्हाण यांनीही आपल्या विद्यार्थ्यांना धान्याच्या वा रोख पैशाच्या स्वरूपात अशी मदत गोळा करण्यासाठी खेडोपाडी पाठवायचे ठरवले. त्यासाठी मुलांचे वेगवेगळे गट केले गेले. रावसाहेबांच्या गटाने सर्वांत जास्त मदत मिळवून आणली. चळवळीतल्या सहभागामुळे लोकसंपर्काची कला त्यांना चांगली अवगत होती आणि शिवाय स्वत:चे बोर्डिंगही चालवत असल्यामुळे अशा कामाचा त्यांना पूर्वानुभवही होता. त्यामुळे पारखे आणि चव्हाण यांचे रावसाहेबांबद्दलचे मत खूपच चांगले झाले. एकूण कोल्हापूर रावसाहेबांना खूप आवडले. पुण्यापेक्षा इथे त्यांना अधिक आपलेपणा वाटला. कोल्हापुरात एक आगळी प्रथा त्यांना पाहायला मिळाली. गंगावेस नावाच्या ठिकाणी आपापल्या म्हशी घेऊन काही शेतकरी रोज सकाळी व संध्याकाळी उभे असायचे. गिन्हाईक आले, की त्याच्या समक्षच म्हशीचे दूध काढून दिले जाई. फक्त एक रुपयात दोन शेर दूध मिळे; तेही अगदी धारोष्ण आणि बिनभेसळीचे. त्यामुळे लांबलांबून लोक येत. रावसाहेबांनी हा प्रकार इतर कुठल्याच गावात कधी बघितला नव्हता. खूपदा ते स्वतः ही तिथे जाऊन दूध प्यायचे. राजाराम कॉलेज, नवा राजवाडा, करवीर नगर वाचनालय, रंकाळा तलाव, ज्योतिबाचा डोंगर, अंबाबाईचे देऊळ, पन्हाळगड, नदी, गल्लोगल्ली - असलेल्या तालमी - हे सगळे कोल्हापूरचे वैशिष्टपूर्ण मानबिंदूच होते. सर्व करवीर नगरीवर शाहू महाराजांची स्पष्ट छाप जाणवायची. भावी आयुष्यात त्यांची सासुरवाडीही इथलीच निघाली, हा एक सुखद योगायोगच ! प्रथम वर्षाची परीक्षा संपल्यावर रावसाहेबांनी कोल्हापूरचा निरोप घेतला, पण जूनमध्ये परीक्षा संपल्यावर परत इथेच यायचे हे मनाशी पक्के करूनच. बघता बघता उन्हाळ्याची सुट्टी संपली. जून उजाडला. अहमदनगरमार्गे कोल्हापूरला परत जायचे रावसाहेबांनी ठरवले होते. अहमदनगरपर्यंत धर्मा पोखरकरांना ते सोबत करणार होते. त्यांनाही कॉलेजात प्रवेश घ्यायचा होता व अहमदनगरला महाविद्यालयातले दिवस... १२१