पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/१२०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

खांडेकरांनी त्यांना पुण्याला जाऊन श्री. म. माटे यांना भेटायचा सल्ला दिला. बराच खटाटोप करून ओलकरांनी ती भेट ठरवली व ठरलेल्या दिवशी ते दोघे पुण्याला जाऊन माटेमास्तरांना भेटले. ओलकरांनीच पुढाकार घेऊन सर्व वृत्तांत माटेंना दिला. “तुमच्याकडे या लेखाची स्थळप्रत आहे का ? स्थळप्रतीवर हा लेख मिळाला म्हणून सही घेतली आहे का ?" वगैरे प्रश्न माटेमास्तरांनी रावसाहेबांना विचारले. पण रावसाहेबांकडे या गोष्टी नव्हत्या; लेखासाठी काढलेली काही जुजबी तेवढी त्यांच्याकडे होती. " त्या साप्ताहिकात प्रसिद्ध झालेला तो लेख तुमचा आहे हे तुम्ही शाबीत कसे करू शकणार?” हा माटेमास्तरांचा नंतरचा प्रश्न होता व त्याला त्या दोघांकडेही काहीच उत्तर नव्हते. शेवटी निराश होऊनच रावसाहेब व ओलकर पुन्हा कोल्हापूरला परतले. ओलकरांना तर फारच मनस्ताप झाला होता. पुण्याला जायचा-यायचा दोघांचाही खर्च त्यांनीच केला होता. एकूणच हे सगळे प्रकरण रावसाहेबांपेक्षा ओलकर यांनीच जास्त मनाला लावून घेतले होते. सगळ्या गाठीभेटी त्यांनीच ठरवल्या होत्या. एक तर रावसाहेबांवर त्यांचा जीव बसला होता. आपण सोडून या मुलाला कोल्हापुरात दुसन्या कोणाचा आधार नाही, आपणच त्याचे इथले पालक आहोत ही त्यांची भावना होती. रावसाहेबांनी या निबंधावर घेतलेले परिश्रम त्यांनी पाहिले होते व त्यांचाही त्यात थोडाफार सहभाग होता. शिवाय आपल्यासमोर एखाद्यावर अन्याय होत असेल तर त्याविरुद्ध आपण झगडले पाहिजे अशीच त्यांची वृत्ती होती. आपल्यासाठी ते घेत असलेला हा त्रास पाहून रावसाहेबांना खूपदा ओशाळल्यासारखे होई. या प्रकरणाकडे मागे वळून बघताना आज रावसाहेबांना तीन गोष्टी जाणवतात. एक म्हणजे, आपल्या लेखनाची स्थळप्रत व स्पर्धेसाठी ते दिल्याची पोच स्वत:कडे न ठेवणे हा वेंधळेपणा आहे; त्यामुळे आपण दुसऱ्याने केलेले वाङ्मयचौर्य उघडकीला आणू शकत नाही; आणि हा वेंधळेपणा आपण सोडला नाही तर या लबाड जगात आपला निभाव लागू शकणार नाही. दुसरे म्हणजे, आपण ज्यांना मोठे समजतो त्या माणसांचे पायही खूपदा मातीचेच असतात; साहित्यिक म्हणून जे श्रेष्ठ असतात ते प्रत्यक्ष वागण्यातही श्रेष्ठ असतात असे नाही; ही साहित्यिक माणसे छोटीही असू शकतात. तिसरे म्हणजे, या निमित्ताने आपला मराठी नाट्यसृष्टीचा जो अभ्यास झाला, जे सखोल वाचन झाले, तोच आपला लाभ समजावा; पारितोषिक नाही मिळाले अजुनी चालतोची वाट... १२०