पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/११९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सर्व आटोपल्यावर रावसाहेबांनी बिल देण्यासाठी मोठ्या अभिमानाने खिशातला तो बंद लिफाफा काढला आणि फोडला. आजवर जेव्हा जेव्हा ते एकत्र कुठे जात तेव्हा तेव्हा नेहमी ओलकरच सगळा खर्च करत. आज प्रथमच आपण तो करू शकतो आहोत याचे रावसाहेबांना अप्रूप होते. पण पाकीट फोडल्यावर त्यांना धक्काच बसला. आत पैसेच नव्हते! आश्चर्याने त्यांच्या तोंडून शब्दच फुटेना. "काय हलकट लोक आहेत साले!" संतापाने ओलकर म्हणाले. ते इतके चिडले होते की त्यांच्या तोंडून इरसाल शिव्या बाहेर पडत होत्या. अर्थात रावसाहेबही चिडले होतेच. पण जे घडले त्यावर आता कोणाकडेच काही इलाज नव्हता. तक्रार करायची म्हटली तरी ती कोणाकडे करणार? आणि पाकिटात पैसेच नव्हते या त्यांच्या म्हणण्यावर विश्वासतरी कोण ठेवणार? आता हॉटेलचे बिल द्यायलाही त्यांच्याकडे पैसे नव्हते; खिसा जवळजवळ रिकामाच होता. त्यांची सगळी भिस्त होती ती बक्षिसाच्या रकमेवर. केक बिस्किटांमुळे आता हॉटेलचे बिलही बरेच आले होते. शेवटी बिचाया ओलकरांनीच ते बिनबोभाट भरले. "निराश होऊ नकोस, पैसे गेले तर जाऊ दे! पण तू यश तर मिळवलंच आहेस ना? ते तर तुझ्याकडून कोणी हिरावून घेऊ शकणार नाही ना?” अशा शब्दांत ओलकरांनी रावसाहेबांचे सांत्वन केले आणि दोघांनी हॉटेल सोडले. पण या प्रकरणातला याहून मोठा धक्का अजून बसायचाच होता. एक दिवस घामाघूम होऊन ओलकर रावसाहेबांकडे आले. त्यांच्या हातात त्यावेळी खूप नावाजलेल्या एका साप्ताहिकाचा अंक होता. "हे पाहिलंस का शिंदे? अरे, आपला लेख या महाभागांनी चोरला! काय निर्लज्जपणा!" घाईघाईने त्यांच्या हातातला अंक घेत रावसाहेबांनी लेख वाचला. सुरुवातीच्या आणि शेवटच्या ओळींमध्ये काही किरकोळ बदल करून रावसाहेबांचाच निबंध त्या साप्ताहिकात छापलेला होता; लेखक म्हणून नाव मात्र साप्ताहिकाचे मालक-संपादक असलेल्या एका बड्या लेखकाचे छापले होते. हे उघडउघड वाङ्मयचौर्य होते. रावसाहेबांच्या निबंधामध्ये सुरुवातीपासून ओलकरांनी खूप रस घेतला होता. त्यांच्याशी वेळोवळी झालेल्या चर्चेचा रावसाहेबांना प्रत्यक्ष लेखनात खूप उपयोगही झाला होता. त्यामुळे त्यांचा संताप अगदी स्वाभाविक होता. हे प्रकरण धसास लावायचे त्यांनी ठरवले; अर्थात याबाबतीत नेमके काय करता येईल याची दोघांनाही काही कल्पना नव्हती. ओलकर या संदर्भात बऱ्याच जणांना भेटले पण फारसा काही उपयोग झाला नाही. एकदा रावसाहेबांना बरोबर घेऊन ते वि. स. खांडेकरांकडेही गेले. महाविद्यालयातले दिवस... ११९