पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/११८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

त्यांना बक्षीस म्हणून काही रक्कम मिळाली. शिवाय विशेष म्हणजे कॉलेजतर्फे दरमहा पाच रुपयांची एक स्कॉलरशिपही मिळाली. रावसाहेबांना त्याचा खूपच उपयोग झाला. रावसाहेबांच्या आयुष्यभर लक्षात राहील अशी आणि साहित्यसृष्टीच्या एका काळ्या बाजूचे त्यांना दर्शन होईल अशी एक घटना त्या सुमारास घडली. 'मराठी नाट्यसृष्टीची शंभर वर्षे' या विषयावर कोल्हापूरच्या एका नाट्यसंबंधित संस्थेने एक निबंधस्पर्धा आयोजित केली होती. प्रथम क्रमांकाला घसघशीत शंभर रुपयांचे बक्षीसही होते. स्पर्धेत भाग घ्यावा असे रावसाहेबांना वाटू लागले. ते त्याबद्दल ओलकरांशी बोलले. ओलकरांनीही त्यांना खूप प्रोत्साहन दिले. पुढले काही आठवडे मग या विषयाचा रावसाहेबांनी ध्यासच घेतला. कॉलेजचा वेळ सोडला तर सगळा वेळ ते वाचनासाठीच देऊ लागले. इब्सेनच्या 'अ डॉल्स हाऊस' पासून मिळतील तेवढी नाटके व नाट्यविषयक पुस्तके वाचायचा त्यांनी सपाटा लावला. जवळजवळ दीडशे पुस्तके वाचून काढली. अधूनमधून ओलकरांशीही या विषयावर चर्चा चाले; त्यांनाही साहित्यात रस होता. खूप मेहनत घेऊन रावसाहेबांनी निबंध पूर्ण केला आणि आपले हस्तलिखित स्पर्धेसाठी पाठवून दिले. रावसाहेबांच्या त्या निबंधाला स्पर्धेत पहिला क्रमांक मिळाला. आठ-दहा दिवसांनी केशवराव भोसले नाट्यगृहात बक्षीस समारंभ होता. वि. स. खांडेकर प्रमुख पाहुणे होते. त्यांच्या हस्ते बक्षीस मिळणार म्हणून रावसाहेबांना खूप आनंद झाला. मोठ्या उत्साहाने ते समारंभाला गेले. सोबत ओलकरही होतेच. नाट्यगृहात आपले नाव पुकारले जाताच रावसाहेब स्टेजवर गेले. टाळ्यांच्या कडकडाटात त्यांनी खांडेकरांच्या हस्ते आपले पारितोषिक स्वीकारले. पाकिटावर होते व शंभराचा आकडाही लिहिलेला होता. आनंदाने ते खाली जाऊन पुन्हा आपल्या आसनावर बसले. कार्यक्रम संपल्यावर रावसाहेब आणि ओलकर बाहेर पडले. नाव "चला, आज मी तुम्हांला चहा पाजतो, " रस्त्यावर येताच खुशीने रावसाहेब म्हणाले. "नुसताच चहा ?" मिस्किलपणे ओलकरांनी विचारले. "चला, केक - बिस्किटंसुद्धा देतो !” रावसाहेब म्हणाले. गप्पा मारतामारता आपल्या नेहमीच्या इराण्याच्या हॉटेलात दोघे गेले. मोठ्या रुबाबात रावसाहेबांनी चहा व केक - बिस्किटांची ऑर्डर दिली. अजुनी चालतोची वाट... ११८