पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/११७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

व देशमुखांची चांगली मैत्री होती व त्यामुळेच हे सगळे जुळून आले होते. ते पत्र घेऊन रावसाहेब तडक प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंगमध्ये गेले व पारखेंना भेटले. पारखे देशमुखांना खूप मानत व त्यामुळे देशमुखांचे शिफारसपत्र वाचताच पारखेंनी रावसाहेबांना बोर्डिंगमध्ये खोली मंजूर केली व लगेच खोली क्रमांकही देऊन टाकला. त्याच दिवशी रावसाहेब बोर्डिंगमध्ये राहायला आले. कॉलेजात पूर्ण फ्रीशिप अप्पासाहेब पवारांमुळे मिळाली होती; आता राहण्याचा आणि जेवणाखाण्याचाही प्रश्न मिटला. ज्या दिवशी त्यांच्या उपासमारीचा अगदी कडेलोट झाला होता नेमक्या त्याच दिवशी ही बोर्डिंगचीही सोय व्हावी हा एक सुखद योगायोग म्हणायचा! हे बोर्डिंग रंकाळा तलावाच्या जवळपास होते. दगडी इमारत होती व वरती मंगलोरी कौले. खोल्या भरपूर होत्या. जेवण भाकरी व कालवण असे साधेच होते, पण रुचकर व पोटभर असायचे. शिवाय सणासुदीला काही गोडधोड करायचीही तिथे पद्धत होती. राजाराम कॉलेजात रावसाहेब चांगले रमले. करवीर नगर वाचनालय हे कॉलेजच्या अगदी समोरच होते. तिथे रावसाहेब नियमित जाऊ लागले. मध्ये खंड पडलेले वाचन आता पुन्हा एकदा जोमाने सुरू झाले. कॉलेजात प्राध्यापकही चांगले होते; मन लावून शिकवत. पुण्याच्या फर्गसन कॉलेजपेक्षा इथले वातावरण वेगळे होते आणि रावसाहेबांना ते खूप जवळिकीचे वाटायचे. अय्यंगार म्हणून एक इंग्रजीचे प्राध्यापक रावसाहेबांना विशेष आठवतात. अगदी देहभान हरपून ते शिकवत. शेलेची एक कविता शिकवताना आपला मुद्दा नीट कळावा म्हणून ते चक्क एका भिंतीकडून दुसऱ्या भिंतीकडे धावले होते. इंग्रजीवर त्यांचे चांगले प्रभुत्व होते. वि. स. खांडेकर आणि ना. सी. फडके हे मराठीतले त्यावेळी खूप गाजत असलेले साहित्यिक. दोघेही तेव्हा कोल्हापुरातच राहात. फडके राजाराम कॉलेजात तत्त्वज्ञान विषय शिकवत. त्यांचे 'झंकार' साप्ताहिक रावसाहेब नाशिकच्या सार्वजनिक वाचनालयात वाचत असत. खांडेकरांच्याही अनेक कादंबऱ्या रावसाहेबांनी तेव्हाच आवडीने वाचल्या होत्या. खांडेकर पूर्णवेळ लेखक होते. एकदा घरी जाऊन त्यांना भेटायची संधीही रावसाहेबांना मिळाली होती. काही दिवसांनी कॉलेजमध्ये दोन वक्तृत्व स्पर्धा झाल्या. एक पूर्वनिश्चित विषयावर बोलायची आणि दुसरी आयत्या वेळी दिलेल्या विषयावर (समयस्फूर्त ) बोलायची. दोन्ही स्पर्धांमध्ये रावसाहेबांनी भाग घेतला. पहिल्या स्पर्धेत त्यांना पहिला क्रमांक मिळाला तर दुसऱ्या स्पर्धेत दुसरा क्रमांक मिळाला. दोन्ही स्पर्धांमध्ये महाविद्यालयातले दिवस... ११७