पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/११५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

ओथंबून भरलेले आहेत. आज कुठले प्रिन्सिपॉल एखाद्या गरीब मुलासाठी इतका समजूतदारपणा दाखवतील? मुळात एखाद्या विद्यार्थ्यासाठी स्वत:चा इतका वेळ खर्च करतील? त्याच्याशी प्रेमाने इतके बोलतील? सोळा रुपये प्रवेश फी भरून रावसाहेबांनी प्रवेश पक्का केला आणि ते कचेरीतून बाहेर पडले, तेव्हा त्यांना फर्गसनमधले ते सहानुभूतिशून्य वातावरण आठवले आणि मन नकळत त्या दोन अनुभवांची तुलना करू लागले. इथे असे प्रिन्सिपॉल नसते तर आज कॉलेजात ते प्रवेश घेऊच शकले नसते. हे प्रिन्सिपॉल म्हणजे डॉ. अप्पासाहेब पवार. पुढे ते शिवाजी विद्यापीठाचे संस्थापक क -कुलगुरू म्हणून प्रख्यात झाले. भविष्यातही त्यांचे आणि रावसाहेबांचे सौहार्दाचे नाते कायम राहिले. कॉलेजप्रवेशाचा प्रश्न आता सुटला होता पण 'राहायचे कुठे' हा प्रश्न केवळ तात्पुरता सुटला होता. ओलकरांच्या युनियन ऑफिसमधली जागा केवळ रात्रीची पथारी पसरण्यापुरती ठीक होती; तिथे फार दिवस काढणे शक्य नव्हते. बरोबर आणलेल्या तेहतीस रुपयांमधले सोळा रुपये तर प्रवेश-फीसाठी गेले होते, पाडळी ते कोल्हापूर प्रवासावर आणि गेल्या दोन दिवसांतल्या जेवणाखाण्यावर बारा-तेरा रुपये गेले होते. त्यामुळे आता खिशात जेमतेम चार-पाच रुपयेच उरले होते. बोर्डिंगचे काम काही अजून झाले नव्हते आणि एका वेळच्या जेवणाचा एक रुपया पकडला तर दोन दिवसांतच जवळचे सगळे पैसे संपून जाणार होते. पुढे काय हा यक्षप्रश्नच होता. अशा परिस्थितीत अन्य कुठल्याही मानी तरुणाने जे केले असते तेच करायला रावसाहेबांनी सुरुवात केली; लक्ष्मीपुरीतल्या एका हॉटेलात सकाळ- संध्याकाळ केवळ उसळ - मिसळ खाऊन ते दिवस काढू लागले. आणा- दोन आण्यांत हे काम भागायचे. पुढे पुढे तर बऱ्याच वेळा काहीही न खाता ते उपाशीच राहू लागले. या उपासमारीचा परिणाम व्हायचा तोच झाला. रावसाहेब सपाटून आजारी पडले. अंगात ताप चढला. दोन-तीन दिवसतर ते युनियन ऑफिसमध्येच पडून होते; तिथेतर पाणी सोडून दुसरे काही मिळणे शक्यच नव्हते. त्यावेळी ओलकर नेमके काही कामानिमित्त बाहेर होते. परतल्यावर लगेचच ते रावसाहेबांना डॉ. धनवडे यांच्या दवाखान्यात घेऊन गेले. डॉ. धनवडे हे कोल्हापुरात अगदी धन्वंतरी समजले जात. ओलकरांचे ते चांगले मित्र होते. त्यांनी लगेच रावसाहेबांची तपासणी केली. तपासणीचाच एक भाग म्हणून "सकाळी काय खाल्लं होतं?” असा प्रश्न त्यांनी विचारला. जेवणातून काही इन्फेक्शन वगैरे झाले नसेल ना अशी शंका महाविद्यालयातले दिवस... ११५