पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/११३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

व सूनही बिचारी तो सगळा छळ मुकाटपणे सहन करत असे; पण पुढे जेव्हा ती तरुण सून स्वतः सासू होत असे, तेव्हा तीही नव्याने येणाऱ्या सुनेचा तसाच छळ करत असे! छळचक्र चालूच राही! 'भूमिपुत्र विरुद्ध बाहेरचे' हा आज जागोजागी आढळणारा वादही काहीसा याच प्रकारचा आहे. कारण प्रत्येक 'भूमिपुत्र' (किंवा त्याचे पूर्वज ) हा पूर्वी केव्हा ना केव्हा 'बाहेरचा' असतोच आणि प्रत्येक 'बाहेरचा' (किंवा त्याचे वंशज) हा नंतर केव्हा ना केव्हा 'भूमिपुत्र' ठरतोच! कोल्हापूर स्टेशनला उतरल्यावर कुठे जायचे हा मोठा प्रश्नच होता; कारण नात्यागोत्याचे असे कोल्हापुरात कोणी नव्हतेच. कॉम्रेड ओलकर नावाचे एक गृहस्थ कोल्हापूरच्या लक्ष्मीपुरी भागात एक विडी कामगार युनियन चालवतात व तिथेच कम्युनिस्ट पक्षाचे ऑफिसही आहे एवढे त्यांनी ऐकले होते. तेवढ्या तुटपुंज्या माहितीवर तिथेच त्यांनी मोर्चा वळवला; दुसरा काही पर्याय नव्हताच. स्टेशनपासून लक्ष्मीपुरी बरीच लांब होती. तिथे पोचल्यावर त्यांचा चांगलाच भ्रमनिरास झाला. त्यांना वाटली होती तशी युनियन ऑफिसची जागा प्रशस्त वगैरे नव्हती. एका चाळीसारख्या बकाल एकमजली इमारतीतील एक छोटीशी तकलादू खोली होती ती. रावसाहेब आत शिरले तेव्हा तिथे पाच-सहा विडीकामगार खाली बसून तेंदूची पाने कापायचे काम करत होते. रावसाहेबांनी आपली माहिती सांगितल्यावर त्या कामगारांनी एक कोपऱ्यात सामान ठेवायला रावसाहेबांना सांगितले. जरा वेळाने ते कामगार आपल्या कामासाठी बाहेर निघून गेले. रावसाहेब एकटेच खोलीत उरले. दार सताड उघडेच होते आणि दाराला लावायला तिथे कुलूपही नव्हते. रावसाहेब तिथेच बसून राहिले. जरा वेळाने कॉ. ओलकर आले आणि दोघांचा परिचय झाला. ओलकर मध्यम वयाचे, भारदस्त व्यक्तिमत्त्वाचे होते. त्यांचे एमएस्सी (M.Sc.) पर्यंत शिक्षण झाले होते व खूप निष्ठेने ते कम्युनिस्ट पक्षाचे काम करत. इथली विडी कामगार युनियन उभारायचे काम पक्षानेच त्यांच्यावर सोपवले होते. तसे ते सुखवस्तू घरातले होते व ताराबाई पार्क या उच्चभ्रू विभागात त्यांचा छोटेखानी बंगलाही होता. रावसाहेबांचे त्यांच्याविषयी प्रथमदर्शनीच खूप चांगले मत झाले व त्यांनीही रावसाहेबांना खूप आस्थापूर्वक वागवले. जवळच्या एका इराण्याच्या हॉटेलात नेऊन ओलकरांनी त्यांना चहा पाजला आणि "बोर्डिंगची सोय होईपर्यंत खुशाल या खोलीवर राहा" असे सांगितले. 'राहायचे कुठे' हा रावसाहेबांपुढचा एक मोठा प्रश्न तात्पुरतातरी सुटला. शिक्षणासाठी राजाराम कॉलेज हे पूर्वीच ठरले होते, पण तिथे फ्रीशिप मिळणे महाविद्यालयातले दिवस... ११३