पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/११२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

होती. वडलांचे असे रडणे रावसाहेबांना ऐकवेना. आयुष्यात कधीच त्यांनी वडलांना असे रडताना पाहिले नव्हते; इतके अगतिक झालेले पाहिले नव्हते. एरवी त्यांचा स्वभाव गावच्या पाटलाला, गढीच्या वतनदाराला शोभेल असाच कणखर होता. मोडेन पण वाकणार नाही असाच त्यांचा बाणा असे. मुलांना जास्तीत जास्त चांगले शिक्षण देणे हे आपले कर्तव्य आहे, पण गरिबीमुळे ते पार पाडण्यात आपण कमी पडतो आहोत, ही जाणीव त्यांना आतल्या आत पोखरून टाकत होती. त्यांची ती अवस्था रावसाहेबांना बघवेना. ते स्वतः पुरते हेलावून गेले होते. " हे तेहतीस रुपयेही खूप झाले. मी बघीन सगळं. तुम्ही काही काळजी करू नका, ” असे म्हणत त्यांनी कसाबसा वडलांना धीर दिला आणि दारात उभ्या असलेल्या बैलगाडीने ते संगमनेरकडे निघाले. संगमनेरला शिंदे बोर्डिंगमध्ये एक दिवस थांबले. महापुरामुळे तिथल्या मुलांची परिस्थितीही खूप बिकट झाली होती; अनेकांना बोर्डिंगमध्ये परतताही आले नव्हते. बोर्डिगबाबत चर्चा करून दुसऱ्या दिवशी ते सर्व्हिस मोटारने (एस.टी.ची बस सर्व्हिस तेव्हा सुरू झाली नव्हती ) पुण्याला गेले आणि तिथून त्यांनी कोल्हापूरची ट्रेन पकडली. गाडी इतकी खच्चून भरली होती की अक्षरश: मुंगी शिरायलाही वाव नव्हता. ट्रेनने प्रवास करायचा प्रसंग रावसाहेबांवर पूर्वी फारसा आला नव्हता. कसेबसे ते सामानासकट आत घुसले. हातातली पेटी वळकटी एका बाकाखाली सरकवली. बसायला बाकावर जागा मिळणे शक्यच नव्हते; खालीच त्यांनी बैठक मारली. प्रवासातली एक बाब त्यांना मोठी गमतीची वाटली. कुठलेही स्टेशन आले, की प्लॅटफॉर्मवरची माणसे डब्यात शिरायचा आटोकाट प्रयत्न करीत; पण अगोदरच डब्यात बसलेले प्रवासी बाहेरच्यांनी डब्यात शिरू नये म्हणून त्यांना प्रचंड विरोध करत. "इथे जागा खाली नाही, पुढच्या डब्यात बघा, ." असा मानभावीपणे सल्ला देत; दरवाजा आतून बंद करत. तशातच धक्काबुक्की करत, जमेल तशी एखादी फट शोधून काढत बाहेरचे प्रवासी डब्यात शिरत; जसे रावसाहेब पुण्याला डब्यात चढले होते. पण एकदा आत प्रवेश मिळाला, की थोड्याच वेळात ही मंडळी स्वतः स्थिरस्थावर होत आणि मग पुढचे स्टेशन आले, की नव्या प्रवाशांना आत यायला तसाच प्रचंड विरोध करत ! तसा आपल्यापैकी बहुतेकांना हा अनुभव केव्हा ना केव्हा आलेला असतो. रावसाहेबांना तो या प्रवासात प्रथमच आला. मनुष्यस्वभावातील एक मोठीच विसंगती यातून स्पष्ट होत होती आणि जीवनाच्या अनेक क्षेत्रांमध्ये या विसंगतींचा प्रत्यय येतो. लग्न होऊन सासरी आलेल्या तरुण सुनेचा सासू खूप छळ करत असे अजुनी चालतोची वाट... ११२