पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/१११

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

व इंदुबाई या तीन मुली अशी चौघांची लग्ने करताकरता दादा पुरते कर्जबाजारी झाले होते. पाडळीतल्या शिमटी या शिवारातील भागातले त्यांचे एक शेत दादांनी गहाण ठेवले होते, पण व्याजासह कर्ज फेडणे त्यांना न जमल्यामुळे ते शेत आता कायमचेच सावकाराकडे गेले होते. अण्णाभाऊ स्वत:ही त्यावेळी कायद्याचे शिक्षण पूर्ण करत होते. अहमदाबादला एका कापडाच्या दुकानात नोकरी करूनच ते आपला खर्च भागवत होते. अशा परिस्थितीत रावसाहेबांचे पुण्यातले शिक्षण घरच्यांना परवडणारे नव्हते. खानावळीव्यतिरिक्त राहण्याचा इतर खर्चही होताच. शिवाय कम्यूनमधली राहायची सोयही थोड्या दिवसांच्या बोलीवरच केलेली होती; दीर्घकाळ तिथे राहणे इष्ट नव्हते. अशा परिस्थितीत रावसाहेबांनी पुण्याऐवजी कोल्हापूरला शिक्षणासाठी जावे असे अण्णाभाऊंचे मत झाले. फर्गसन कॉलेजात त्यांचा जीव किती घुसमटतो आहे याची अण्णाभाऊंना पूर्ण कल्पना होती. त्यापेक्षा कोल्हापूर अधिक सोयीचे वाटत होते. तिथे प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंगमध्ये विद्यार्थ्यांची राहण्याची व जेवणाची मोफत सोय होत असे. राजाराम कॉलेजात फीबाबत सवलत मिळण्यासारखी होती. त्या सर्वच कुटुंबात अण्णाभाऊ विचारी म्हणून प्रसिद्ध होते व त्यांच्या मताला खूप किंमत होती. साहजिकच रावसाहेबांनी फर्गसन सोडून कोल्हापूरला जायचा निर्णय घेतला. त्या वर्षी दिवाळीला जोडूनच अगदी जोरदार पाऊस झाला; अतिवृष्टीच झाली. पिके बुडून गेली, जनावरे दगावली. सणासुदीचा सगळा आनंद कुठल्याकुठे वाहून गेला. तशातच रावसाहेबांच्या शिक्षणासाठी पैशाची काही तजवीज करता येते का ते पाहावे म्हणून दादांची धावपळ सुरू होती. आपली पेटी - वळकटी घेऊन जेव्हा रावसाहेब कोल्हापूरसाठी निघाले, तेव्हा दादांनी त्यांच्या हाती तेहतीस रुपये दिले. ते मोजून रावसाहेब खिशात घालतानाच दादा एकाएकी हमसाहमशी रडायला लागले. हुंदके देत सांगू लागले, "भाऊ, गेले पाच-सहा दिवस मी इकडेतिकडे खूप फिरलो, ठाणगावलाही जाऊन आलो, पण कुठेच पैशाची काही सोय होऊ शकली नाही. घरातलं धान्य विकायचाही खूप प्रयत्न केला, पण धान्यालाही काही भाव नाही. म्हणून मग शेवटी मी तुम्हांला एवढेच पैसे देऊ शकलो. जास्त नाही जमवता आले. तुम्ही दूर जाणार. कोल्हापूरसारखं नवखं ठिकाण. आम्ही तर तो प्रदेश उभ्या आयुष्यात पाहू शकलेलो नाही. कोणाची ओळख नाही, पाळख नाही. प्रवासखर्च, कॉलेज, राहणं, खाणं, पुस्तकं, वह्या हे तुमचं सगळं ह्या तेहतीस रुपयांत कसं भागणार ?” मुलांना ती मोठी झाल्यावर दादा अहो - जाहोच करत; ती त्यांची खानदानी अब महाविद्यालयातले दिवस... १११