पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/११०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

रावसाहेबांनी तेव्हा पळ काढला होता. चळवळीतली ही धामधूम तशी रोमहर्षक होती, पण दुसऱ्या दिवशी कॉलेजात गेले, की पुन्हा एकदा त्यांना उदास वाटू लागे. त्यांचे औदासीन्य दूर करणारी, निराश मनाला थोडीफार उभारी देणारी एक घटना अनपेक्षितपणे घडली. १८७१ साली सुरू झालेल्या पुण्यातल्या सुप्रसिद्ध रानडे वक्तृत्वोत्तेजक सभेतर्फे दरवर्षी एक वक्तृत्व स्पर्धा भरायची. ( पुण्यातली वसंत व्याख्यानमाला हे तिचेच आजचे रूप.) ती सर्वांसाठी खुली असे. रावसाहेबांनी त्यात भाग घ्यायचे ठरवले. कऱ्हाडकर नावाचे त्यांचे एक स्नेही त्यावेळी कम्युनिस्ट पक्षाचे पूर्णवेळ काम करत. ते कम्यूनमध्येच राहायचे. रावसाहेबांची पक्षप्रचाराची ग्रामीण भागातली बरीच भाषणे त्यांनी ऐकली होती. त्यांनीही रावसाहेबांना स्पर्धेत भाग घ्यायला खूप उत्तेजन दिले. "तुम्हांला नक्की बक्षीस मिळेल," असे ते सारखे सांगत. योगायोगाने स्पर्धेसाठीचा विषयही शेतकरी, कामगार अशा श्रमजीवींच्या संबंधातलाच होता. या विषयाचा रावसाहेबांचा चांगलाच अभ्यास होता. त्यांनी एक उत्तम भाषण लिहून काढले; ते पुन:पुन्हा मोठ्याने वाचले. फर्गसन कॉलेजच्या मागच्या टेकडीवर एका जागी १२ जून १९०५ रोजी गोपाळ कृष्ण गोखले यांनी सर्व्हट्स ऑफ इंडिया सोसायटीची (भारत सेवक समाजाची) स्थापना केली होती. संपूर्ण आयुष्य देशसेवेसाठी वाहून घेण्याची शपथ त्यांनी त्याप्रसंगी घेतली होती. त्या प्रसंगाची नोंद घेणारी एक स्मरणशिलाही तिथे उभारलेली आहे. त्या शिळेसमोर उभे राहून रावसाहेब आपल्या प्रत्यक्ष भाषणाचा सराव करत असत. शेवटी स्पर्धेचा दिवस उजाडला. तयारी भक्कम केलेली असल्याने रावसाहेबांना चांगला आत्मविश्वास होता. भाषण उत्तम झाले व स्पर्धेत त्यांना पहिले बक्षीस मिळाले. बक्षिसाची रक्कम १५० रुपये अशी घसघशीत ोती. बादशाही खानावळीत जेवणाचे महिन्याचे बिल त्यावेळी वीस रुपये होते; यावरून या बक्षिसाचे मोल तेव्हा किती असेल याची कल्पना येते. एक ग्रामीण भागातला विद्यार्थी, त्यातून पुन्हा पहिल्याच वर्षात पहिल्या टर्मला असलेला विद्यार्थी, हे मानाचे पारितोषिक मिळवतो याची सर्वांनी विशेषच प्रशंसा केली. स्वत: रावसाहेबांना तर खूपच आनंद झाला. कॉलेजातील त्यांच्या एकूण नामुष्कीच्या पार्श्वभूमीवर हा अनपेक्षित गौरव खूपच दिलासा देणारा होता. अर्थात त्यामुळे एकूण परिस्थितीत काही फरक पडणार नव्हता. दिवाळीच्या सुट्टीत रावसाहेब पाडळीला घरी गेले. तिथली अवस्थाही बिकट झाली होती. शेतीमधला तोटा खूपच वाढला होता. मोठे पाटीलभाऊ आणि चहाबाई, जयाबाई अजुनी चालतोची वाट... ११०