पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/१०९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अनुशेष कसा भरून काढायचा हाही प्रश्न होताच. या सगळ्या अडचणींमुळे रावसाहेब तणावाखाली होतेच. तशात इथे कोणालाच आपल्या सुखदुःखांशी काही देणेघेणे नाही या वेदनेची भर पडली. रावसाहेब म्हणतात, "फर्गसन कॉलेज हे नाव तर फार मोठे. पण या मोठेपणात लहानांच्यासाठी कुठेच काही जागा नव्हती. मी महिना, दीड महिना उशिरा वर्गात प्रवेश घेतलेला विद्यार्थी, पण एकाही प्रोफेसरने माझी कधीही चौकशी केली नाही. एकूण वातावरण माणुसकीशून्य आणि भावनाशून्य होते. कधी एकदा आपली यातून सुटका होईल याचीच मी वाट बघू लागलो. " रात्री झोपण्यासाठी त्यांची ज्या कम्यूनमध्ये सोय झाली होती तिथल्या कम्युनिस्ट कार्यकर्त्यांमध्ये मात्र परस्परप्रेमाचे, आपुलकीचे वातावरण होते. अगदी संगमनेरच्या शिंदे बोर्डिंगप्रमाणेच. त्यामुळे रात्रीचा तो वेळ तसा आनंदात जायचा. जेवणासाठी ते रोज जवळच्या बादशाही लॉजच्या खानावळीत जात. पी. बी. कडू पाटील व इतर काही जुने मित्रही तिथे जेवायला येत. त्यांच्याशी गप्पा मारण्यात तो वेळ तेवढा मजेत जायचा, पण एरवी कॉलेजमधला दिवस मात्र त्यांना अगदी नकोसा होई. कडू पाटील त्यावेळी कम्युनिस्ट पक्षाच्या कामात पूर्णवेळ सक्रिय होते. कॉलेजनंतरच्या वेळात रावसाहेबही त्यांच्याबरोबर पक्षाचे काम करू लागले. विभागातून पुणे विभागातील रेल्वे कर्मचाऱ्यांना नॅशनल रेल्वे मझदूर युनियनचे सभासद म्हणून नोंदवून घेण्यापासून या कामाला सुरुवात झाली. देशातील महत्त्वाच्या उद्योगक्षेत्रांमध्ये स्वत:च्या मजबूत संघटना उभारण्यावर पक्षाचा त्यावेळी भर होता. बंदर आणि गोदी कामगार, रेल्वे कामगार, बँक कर्मचारी हे त्यादृष्टीने फार महत्त्वाचे होते. संख्यात्मक विचार केला तर ते कामगार म्हणजे एकूण लोकसंख्येचा खूपच छोटा हिस्सा होता, पण त्यांच्या कामाचे स्वरूपच असे होते, की त्यांनी संप पुकारल्यावर एकूणच देशाच्या नाड्या आखडल्या जात. कम्युनिस्ट पक्षाचे खूप मोठे सामर्थ्य या अशा मोक्याच्या कामगारसंघटनांवर अवलंबून होते. पक्षाचे लोकयुद्ध हे मुखपत्र ओरडून रस्तोरस्ती विकायचे कामही पक्षाकार्यकर्ते करत. तत्कालीन पुण्यात हिंदुत्ववाद्यांचा व काँग्रेसवाल्यांचा जोर होता; हे दोन्ही गट कम्युनिस्टांच्या प्रखर विरोधात होते. रस्त्यावर उतरले, की त्यांच्या त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये भांडणेही होत. लकडी पुलावर लोकयुद्ध विकताना एकदा धर्मा पोखरकर, पी. डी. गुजराथी, गोपाळ गोखले वगैरे तरुण कार्यकर्त्यांबरोबर रावसाहेबांनाही बराच मार खावा लागला होता. कसाबसा जीव मुठीत धरून महाविद्यालयातले दिवस... १०९