पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/११

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

शेवटी त्या लेखकाच्या विशिष्ट जीवनदृष्टीत व त्या जीवनदृष्टीनुसार लेखनाच्या आशयाला, मूलद्रव्याला त्याने दिलेला कलात्म आकार यांच्यातच सामावलेले असते. कारण अंतिमत: चरित्र म्हणजे केवळ विस्तारलेला बायोडेटा नव्हे; चरित्र हीदेखील एक साहित्यिक कलाकृतीच असते. चरित्रलेखनाचा हा माझा पहिलाच प्रयत्न. या प्रयत्नात मागची दोन वर्षे खूप आनंदात गेली, जीवन समृद्ध करून गेली. त्या निमित्ताने माझ्यासारखा शहरी माणूस ग्रामीण भागाशी प्रथमच जिवाभावाच्या नात्याने जोडला गेला. पण त्याचवेळी चरित्रलेखनातली - विशेषत: आपल्या जवळिकीतल्या व्यक्तीच्या - - चरित्रलेखनातली – एक मोठी अडचणही मला जाणवली. चरित्र लिहिताना विश्लेषण व मूल्यमापन अपरिहार्य असते आणि जवळिकीतल्या माणसाचे असे विश्लेषण व मूल्यमापन करणे खूपच अवघड असते. आपल्या जीवनात दुसरी एखादी बाहेरची व्यक्ती खूप डोकावते आहे, ही नुसती जाणीवही संबंधित व्यक्तीला व तिच्या आप्तांना तापदायक ठरू शकते. त्यामुळे नातेसंबंध दुरावू शकतात, तुटूही शकतात. रावसाहेबांनी हे घडू दिले नाही हा त्यांच्या मनाचा मोठेपणा. आयुष्याच्या प्रवासात काही माणसे अशी भेटतात, की ती आपल्या आयुष्यात खूप पूर्वीच यायला हवी होती असे वाटत राहते. रावसाहेब हे असेच एक लोभस व्यक्तिमत्त्व आहे. या पुस्तकाच्या निमित्ताने आम्ही अगणित वेळा भेटलो, तासन्तास चर्चा केली, भरपूर प्रवासही केला; पण त्यांनी कधीही कंटाळा वा आळस दाखवला नाही. तीन- चार वेळा त्यांनी संपूर्ण हस्तलिखित उत्साहाने वाचले, प्रत्येक वेळी बहुमोल सूचना केल्या. त्यांच्या अगत्यपूर्वक केलेल्या या सहकार्याशिवाय हे पुस्तक कधीच लिहून झाले नसते. या प्रत्येक भेटीत त्यांच्यासोबत सौ. शशिकलाताईही होत्या याचाही आवर्जून उल्लेख करायला हवा. म्हणूनच सर्वप्रथम या दोघांचे अगदी मनापासून आभार मानतो. त्यानंतर आभार मानायला हवेत ते त्यांच्या ज्येष्ठ कन्या सौ. शुभाताई व त्यांचे यजमान, शेतकरी संघटनेतील शरद जोशी यांचे विश्वासू सहकारी बद्रीनाथ देवकर यांचे. योगायोगाने ते आमच्या शेजारच्याच इमारतीत राहतात व आमचे घरगुती संबंध आहेत. रावसाहेबांच्या सिंगापूरस्थित कनिष्ठ कन्या सौ. सुजाता व त्यांचे यजमान काकासाहेब हुंबे देशमुख यांचे व रावसाहेबांचे चिरंजीव डॉ. राजीव व स्नुषा डॉ. प्रेरणा यांचेही मोलाच्या सूचनांबद्दल व इतर सहकार्याबद्दल आभार. याशिवाय रयत शिक्षण संस्थेतील प्राचार्य ज्ञानदेव म्हस्के, प्राचार्य अरुण आंधळे, प्राचार्य टी. ई. शेळके, प्राचार्य सहदेव चौधरी, प्राचार्य लक्ष्मण दाजी भोर व त्यांचे