पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/१०८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

त्यांच्या आजवरच्या शाळांमधील शिक्षकही कधीकधी खूप कडक वागत, मुलांना रागावत; प्रसंगी मारतही. कधी करकचून कान पिळत तर कधी पाठीत जोराने धपाटाही मारत. पण त्या मारण्यातही एक प्रकारचे प्रेम असे, मुलांना धडे नीट समजले पाहिजेत ही आस असे. त्या मुलांच्या यशातच शिक्षकांना आनंद होता; स्वत:चे श्रम सार्थकी लागल्याचे समाधान होते. रावसाहेबांना स्कॉलरशिप मिळाली तेव्हा तोरकडीमास्तरांना केवढा आनंद झाला होता आणि केवढे लांब- लांब सायकलने जाऊन त्यांनी पेढे वाटले होते! जणू त्यांच्या स्वतःच्याच मुलाला स्कॉलरशिप मिळाली होती! रावसाहेबांचे शब्दचित्र सर्कल थेटरमध्ये सगळ्यांसमोर वाचून दाखवताना पुरोहितसरांनाही केवढा आनंद आणि अभिमान वाटला होता! त्या पार्श्वभूमीवर फर्गसनमधले प्राध्यापक त्यांना कमालीचे शुष्क आणि नीरस वाटू लागले. हे प्राध्यापक वर्गात शिरत, हातातले पुस्तक उघडत आणि अत्यंत यांत्रिकपणे शिकवू लागत. समोरच्या विद्यार्थ्यांना जणू त्यांच्या लेखी अस्तित्वच नव्हते. कोणाशी काही संवाद नाही, कसली चौकशी नाही, आपण शिकवत आहोत ते विद्यार्थ्यांना समजते आहे की नाही याची फिकीर नाही. वर्गातल्या खिडक्या-दारांप्रमाणे, फळा- बाकांप्रमाणे, भिंती-पंख्यांप्रमाणे समोरचे विद्यार्थीदेखील जणू निर्जीव वस्तू होत्या. रावसाहेबांना हे सगळे वातावरण अतिशय परकेपणाचे, तुसडेपणाचे वाटू लागले. एकूणच, वागण्याबोलण्यातील परस्परप्रेम हे रावसाहेबांना कायमच फार महत्त्वाचे वाटत आले आहे. आजही ज्या नात्यामध्ये त्यांना जिव्हाळ्याचा अभाव जाणवतो, शुष्कता जाणवते ते नाते त्यांना आतल्या आत कुठेतरी खटकत राहते. व्यावहारिक पातळीवर ते सर्व नाती सांभाळतील, रीतीला चुकणार नाहीत; पण नात्यात प्रेमाचा ओलावा नसेल तर तिथे त्यांचा जीव रमत नाही. तसे पाहिले तर एकाच शहरातील शाळा आणि कॉलेज फरक असतोच; कॉलेजातले वर्ग मोठे, विद्यार्थी प्रौढ, त्यांची संख्याही बरीच जास्त. या सगळ्यामुळे कॉलेजातील वर्गात आपोआप एक तुटकपणा येतोच. छोट्या गावातील कॉलेज आणि मोठ्या शहरातील कॉलेज यांच्यातही हा असा फरक असतो. त्यात पुन्हा संगमनेरसारख्या छोट्या गावातील शाळा आणि पुण्यासारख्या मोठ्या शहरातील फर्गसनसारखे कॉलेज यांच्यासारख्या दोन टोकांच्या आस्थापनांत हा फरक तर कोणालाही जाणवेल इतका तीव्र असणारच. पण रावसाहेब तसे मुळातच संवेदनाक्षम होते; जीवघेण्या आजारातून नुकतेच उठल्यामुळे खूपसे हळवेही झाले होते. पुण्यात शिक्षणासाठी खर्चाची तजवीज कशी करणार याची चिंता होती. दीड महिना उशिरा कॉलेजात दाखल झाल्यामुळे पडलेला वर्गातल्या अभ्यासाचा अजुनी चालतोची वाट... १०८