पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/१०७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

६ महाविद्यालयातले दिवस मॅट्रिकनंतर रावसाहेबांनी शास्त्रशाखेला जावे अशी अण्णासाहेबांची खूप इच्छा होती. डॉक्टर होणे हा त्याकाळी समाजसेवा करण्याचा एक चांगला मार्ग समजला जाई. ठाणगावचे सवाईदादा किंवा संगमनेरचे डॉ. मामा गाडगीळ यांच्यासारखे जे डॉक्टर त्यांनी पाहिले होते ते डॉक्टरकीच्या पेशाबद्दल मनात आदर वाटावा असेच होते. दुर्दैवाने मॅट्रिकच्या परीक्षेनंतर ओढवलेल्या रावसाहेबांच्या गंभीर आजारपणात एक-दीड महिना फुकट गेला होता. त्यामुळे प्रवेशप्रक्रियेसाठी जेव्हा ते पुण्याला आले त्यावेळी शास्त्रशाखेच्या जागा शिल्लक उरल्या नव्हत्या. त्यामुळे त्यांनी फर्गसन कॉलेजला कलाशाखेत प्रवेश घ्यायचे ठरवले. मागे एकदा प्लेगच्या साथीमुळे कम्युनिस्ट पक्षाच्या गणेशवाडीतल्या ज्या कम्यूनमध्ये त्यांनी एक-दीड महिना काढला होता त्याच कम्यूनमध्ये आत्ताही अण्णाभाऊंनी त्यांची तात्पुरती व्यवस्था केली होती व ते फर्गसन कॉलेजला अगदी लागूनच होते. शिवाय फर्गसन कॉलेजचा नावलौकिक तेव्हा फक्त पुण्यातच नव्हे तर संपूर्ण देशभर पसरला होता. पण प्रथमदर्शनीच फर्गसन कॉलेजबद्दल त्यांचे वाईट मत झाले. प्रवेश घेण्यापूर्वी प्रिन्सिपॉलना भेटणे नियमानुसार आवश्यक होते. त्याप्रमाणे रावसाहेब प्रिन्सिपॉलांच्या ऑफिसात गेले. मॅट्रिकला रावसाहेबांची टक्केवारी ५६ अधिक काही पॉइंट्स अशी होती; पण ते सांगताना त्यांच्याकडून चूक झाली. त्यावरून प्रिन्सिपॉल भडकले. चूक आपलीच आहे हे रावसाहेबांना मान्य होते, पण त्यावरून प्रिन्सिपॉलनी इतके रागवायचे काही कारण नव्हते, असे रावसाहेबांना वाटले. प्रिन्सिपॉलांच्या वागण्यात त्यांना पोलिसी खाक्याच अधिक दिसला. प्रथमभेटीतच त्यांच्या मनात प्रिन्सिपॉलांविषयी आदराऐवजी तिरस्काराचीच भावना निर्माण झाली. आणि पुढल्या काही दिवसांनंतर त्यांना फर्गसन कॉलेजविषयीच तिरस्कार वाटू लागला. महाविद्यालयातले दिवस... १०७