पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/१०६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( purposeful) जीवन जगण्याचा हा अनुभव होता. इथे जे शिकायला मिळाले ते कोणत्याच शाळेत वा कॉलेजात शिकायला मिळाले नसते. म्हणूनच रावसाहेब म्हणतात, "त्या विश्वात रममाण होण्याची मनाला आजही ओढ लागते. " बोर्डिंगचा दीर्घकालीन प्रभाव अधोरेखित करणारा एक ताजा अनुभव सांगण्यासारखा आहे. काही महिन्यांपूर्वी आम्ही काही जण प्रा. सदगीर यांच्या संगमनेर येथील घरी गेलो होतो. आताशा त्यांची तब्येत बरी नसते, पण तरीही ते बोर्डिंगमधल्या दिवसांविषयी भरभरून बोलत होते. खोलीच्या एका भिंतीवर टांगलेल्या मोठ्या रंगीत फोटोकडे सहज माझी नजर गेली. जवळ जाऊन बघितल्यावर फोटोतली ती भव्य अत्याधुनिक इमारत काहीशी ओळखीची वाटली. इमारतीसमोर एक मुलांची रांग दिसत होती. प्रा. सदगीरही उठून फोटोजवळ आले आणि फोटोवर एक बोट ठेवत अभिमानाने सांगू लागले, "इथला हा माझा मुलगा. खूप हुशार आहे. मोठा आय.टी. इंजिनिअर झाला आहे. इन्फोसिस कंपनीत लागला आहे. सध्या ट्रेनिंग सुरू आहे. ते संपलं, की अमेरिकेला जाईल. फोटोत ही मुलं ज्या इमारतीसमोर उभी आहेत ते त्याचं हॉस्टेल. त्यांच्या म्हैसूरमधल्या ट्रेनिंग कँपसमधलं.” त्या कँपसची मला माहिती होती. एका वेळेला चौदा हजार विद्यार्थी अगदी आरामात राहू शकतील असा तो ३३० एकरांचा पंचतारांकित रेसिडेन्शिअल ट्रेनिंग कँपस होता. असे म्हणतात, की हे जगातील सर्वांत मोठे हॉस्टेल. तो फोटो बघता बघता माझ्या डोळ्यांसमोर ठाकोरांच्या मळ्यातल्या त्या साध्यासुध्या, तकलादू शिंदे बोर्डिंगचे आणि त्यात राहणाऱ्या त्या तीस-चाळीस ग्रामीण मुलांचे कल्पनाचित्र उभे राहिले. त्या कल्पनाचित्रात कुठेतरी तरुण रावसाहेब होते, तसेच त्यावेळचे तरुण सदगीरही होते. ते बोर्डिंग नसते, तर आज कदाचित सदगीरांच्या भिंतीवरचा तो फोटोही नसता ! अजुनी चालतोची वाट... १०६