पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/१०५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

धागा लांब लांब पत्रांनी जोडला जाई. तडाखेबंद भाषणशैली आणि विचारप्रवर्तक परंतु हळुवार लेखणी यांचे प्रभावी सामर्थ्य लाभलेला हा आमचा नेता राजकारण निकोप असते तर श्रीरामपुरातच अडकला नसता. आता जेव्हा कधीतरी कुठल्या कम्यूनबद्दल वाचण्यात येते तेव्हा वाटू लागते - अरे, असे तर आमचेही कम्यून होते! आज तीन-चार तपे लोटून गेल्यावर परिस्थिती, जग सगळे कसे बदलून गेले आहे; आम्हीही बदलले असू; पण त्या काळातली ती मोहिनी आजही मनाला उत्साहाचे भरते आणते." - पुढे बी. एड. कॉलेजचे प्राचार्य बनलेले अकोलेच्या आदिवासी समाजातील प्रा. ए. डी. सदगीर लिहितात : • "एकदा आमच्या बोर्डिंगमधली काही मुले काही कारणाने शेतकरी बोर्डिंगवर जायला निघाली. त्यांनी आमचे बोर्डिंग सोडून जाऊ नये म्हणून आम्ही बाकीच्या मुलांनी त्यांना विरोध केला. याचवेळी रावसाहेब पुण्याहून आले. झाला प्रकार त्यांना समजला तेव्हा ते म्हणाले, 'अरे, ते बोर्डिंगसुद्धा आपलेच आहे. या मुलांना जर त्या बोर्डिंगमध्ये जाणे सोयीचे वाटत असेल तर त्यांना जाऊ द्या तिकडे. ते आपले मित्र आहेत आणि तिकडे गेले तरी ते आपले मित्रच राहतील.' हा समजूतदारपणा आणि उदार दृष्टिकोन पाहून आम्हांला आमच्या संकुचित मनोवृत्तीची लाज वाटू लागली आणि या माणसाबद्दल अधिकच आदर वाटू लागला. हा माणूस विद्यार्थिदशेत तरी आम्हांला पाहिजे तेवढा समजला नाही; तरीपण मोठ्यांच्यात मोठ्यांसारखे वागणे व छोट्यांच्यात छोट्यांसारखे वागणे हा त्याचा एक स्वभावविशेष होता. या बोर्डिंगमध्ये असतानाच रावसाहेबांनी आम्हांला जीवनाचे तत्त्वज्ञान शिकवले आणि आमच्या भावी आयुष्याची तयारी करून घेतली. " ' होते म्हणू स्वप्न एक, एक रात्र पाहिलेले, होते म्हणू वेड एक, एक रात्र राहिलेले' अशा शब्दांमध्ये शिंदे बोर्डिंगच्या उपक्रमाचे वर्णन करायचा मोह टाळला पाहिजे; कारण या बोर्डिंगचा प्रभाव इतका क्षणभंगुर कधीच नव्हता. अनेकांच्या अवघ्या जीवनालाच इथल्या वास्तव्याने आकार दिला. एखादी आस्थापना शून्यातून सुरू करण्याचा आणि चांगल्याप्रकारे चालवण्याचा रावसाहेबांचा हा आयुष्यातला पहिलाच अनुभव. पुस्तकात वाचलेले आणि भाषणातून ऐकलेले अनेक विचार प्रत्यक्ष कार्यवाहीत आणण्याची संधी इथे त्यांना मिळाली. वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी आणि मुख्यतः स्वबळावर त्यांनी हे आगळे धाडस केले. सर्व जातिभेद विसरून एखाद्या कुटुंबाप्रमाणे 'एकमय' होऊन राहण्याचा, अर्थपूर्ण शिंदे बोर्डिंग... १०५