पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/१०४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१९४४ ते ऑगस्ट १९४८ अशी चार वर्षे चाललेले रावसाहेबांच्या आयुष्यातले एक वेधक प्रकरण संपले. शिंदे बोर्डिंगमध्ये त्या काळात राहिलेल्या काही मुलांच्या आठवणी खूप बोलक्या आहेत. (संदर्भ : रावसाहेबांच्या षष्ट्यब्दीपूर्तीनिमित्ताने काढलेली गौरविका ) अकोले गावचे डॉ. बी. जी. बंगाळ लिहितात : 16 'भूमिगत चळवळीत स्वत:ला झोकून दिल्यानंतर एकदा रावसाहेब चांदण्यारात्री बोर्डिंगमध्ये आले. ही बैठक माझ्या विशेष लक्षात राहण्याचे कारण म्हणजे रावसाहेबांची वक्तृत्वशैली. भाषणात ते म्हणाले, 'बाहेर टिपूर चांदणं पडलंय, थंडगार मंद वारा सुटलाय, नीरव शांतता पसरलीय. अशा वातावरणात एखादा सुखवस्तू गृहस्थ आपला बंगला कोणत्या पद्धतीचा बांधावा याचा विचार करत असेल. एखादा सिनेदिग्दर्शक उद्याचे शूटिंग कोणत्या ठिकाणी घ्यावे याचा विचार करत असेल. एखादा प्रियकर आपल्या प्रेयसीला कोणता उपहार द्यावा याचा विचार करत असेल. परंतु याच वेळी आपल्या डोक्यात मात्र उद्याच्या भाकरीची भ्रांत पडलेल्या दीन-दुबळ्यांच्या दुःखावर तोडगा शोधण्याचे विचार घोळतात. खरोखर आपण किती भाग्यवान !' अशी सुरुवात करून दीड-दोन तास भाषण करून ते चांदण्यात अदृश्य झाले. माझ्या या मित्राने स्वत: करिता शिवलेले कपडे माझ्या अडचणीच्या वेळी मला देऊन टाकले. विद्यार्थिदशेत मला माझ्या आयुष्यातला पहिला स्टेथोस्कोप विकत घ्यायला स्वत:च्या त्यावेळच्या तुटपुंज्या उत्पन्नातूनही मला पैसे दिले. या आठवणींचा सुगंध कधीच जाणार नाही. " के. बी. अनाप हे सिन्नर तालुक्यातल्या वावी गावचे एक बोर्डिंगमधले विद्यार्थी ते दिवस आठवताना अनाप लिहितात : "रावसाहेब वसतिगृहातील प्रत्येक विद्यार्थ्याची गुरू, पिता, मित्र या सगळ्या नात्यांनी काळजी घेत. वसतिगृहातला तो तीन-चार वर्षांचा काळ आम्हां सर्वांच्याच आयुष्यातला उमलण्याचा काळ. आम्ही नियमितपणे एकत्र बसून सर्वांच्याच गुणदोषांची चर्चा करीत असू. माझ्यावर चिडखोरपणाची टीका झाली तेव्हा मी जोरजोराने इन्कार केला. पण त्यातून अनायासे त्या चिडखोरपणाचे प्रात्यक्षिकच झाले; तेव्हा सगळे सहकारी हसू लागले! त्या काळात रावसाहेबांच्या प्रोत्साहनाने अप्टन सिंक्लेअर, मॅक्झिम गॉर्की, वि. स. खांडेकर यांच्या कादंबऱ्या वाचल्या. उन्हाळ्याच्या सुट्टीत हा मित्रत्वाचा अजुनी चालतोची वाट... १०४