पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/१०३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

शेष हीच होती. त्यांच्या पाडळी गावात नागपंचमी हा खूप महत्त्वाचा सण मानला जाई. आपल्या घरातही तो थाटात साजरा होताना ते लहानपणापासूनच पाहत आले होते. नागोबाच्या चित्राची घरात पूजा होई. लोक उत्साहाने वारुळाला जाऊनही नागाची पूजा करत. त्याच्यासाठी दुधाचा नैवेद्य ठेवला जाई. त्या दिवशी घरी कोणी काही कापायचे नाही, भाजायचे नाही, दोराची गाठ मारून काही बांधायचे नाही अशा प्रथा पाळल्या जात. तसे केल्यास थेट नागोबाला इजा पोचते असे मानले जाई. घरी जेवायला फक्त उकडलेले मुटके असत. साप हा शेतकऱ्यांचा मित्र आहे हीही या सगळ्यामागे एक भावना होती. असे असताना आपल्याच जिवलग मित्राला सापाने का चावावे? आणि तेही नेमक्या नागपंचमीच्या दिवशी? असे सारे प्रश्नही त्यांच्या मनात येत होते आणि त्यामुळेही ते खूप खचून गेले होते. विश्वनाथ ज्या खोलीत इतर दोघांबरोबर झोपला होता तिथल्या फरशा त्या पहाटे वरखाली झाल्या होत्या; जमिनीखालीही मोठमोठ्या भेगा पडल्या होत्या. रावसाहेब झोपले होते त्या बाजूच्या शेतातही दोन साप काही मित्रांना दिसले होते. त्या शेतात सापाचेच पीक निघाले होते की काय ? बोर्डिंगभर एकच घबराट उडाली होती. रावसाहेब त्याच शेतात अजूनही लपून बसले असल्याने त्यांनाही साप चावायची भीती होती व त्यामुळे त्यांचे मित्र जास्तच भेदरलेले होते. झोपेतून उठून रावसाहेब जेव्हा काय गडबड आहे हे पाहायला बोर्डिंगमध्ये आले, तेव्हाच इतर विद्यार्थ्यांची ती भीती दूर झाली. कसेबसे रावसाहेबांनी विश्वनाथच्या निधनानंतरचे सगळे सोपस्कार निस्तरले विश्वनाथचा मृतदेह पाडळीला नेण्यात आला व म्हाळुगी नदीच्या काठी त्याच्यावर अंत्यसंस्कार केले गेले. सगळ्या गावावर शोककळा पसरली. थोड्याच दिवसांनी त्यांनी पुन्हा एकदा बोर्डिंगला भेट दिली. तिथले वातावरण आता अगदी मलूल होते. एकेकाळी तिथे असणाऱ्या चैतन्याचा आता मागमूसही उरला नव्हता. विद्यार्थ्यांची आता त्या बोर्डिंगमध्ये राहायची तयारीच राहिली नव्हती; पण हे सगळे रावसाहेबांना कसे सांगायचे हाच त्यांच्यापुढचा प्रश्न होता. बोर्डिंगवर रावसाहेबांचा किती जीव आहे आणि ते बंद करायचे या कल्पनेने ते किती दुखावतील याची त्या मित्रांना कल्पना होती. पण त्यांनी न सांगताही रावसाहेबांना सगळे कळून चुकले होते. त्यांनीच शेवटी हा विषय काढला आणि दुसरी सोय करायची मित्रांना परवानगी दिली. त्यासाठी त्यांना मदतही केली. भूमिगत असल्यामुळे त्यांच्या बाहेर पडण्यावर खूप मर्यादा होत्या, पण त्याही परिस्थितीत ते सगळीकडे फिरले. शिंदे बोर्डिंग अधिकृतरीत्या बंद झाले. जून शिंदे बोर्डिंग... १०३