पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/१०२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

रावसाहेब शेजारच्या कडवळच्या (हलक्या प्रतीच्या ज्वारीच्या) शेतात जात, तिथल्या पिकातच अंग पसरत; कारण बोर्डिंगमध्ये झोपले तर पोलिसांकडून पकडले जायची खूप शक्यता होती. त्या दिवशीही तसेच झाले. मुलांबरोबर रात्रीचे सणासुदीचे गोडधोड जेवण उरकून झोपण्यासाठी रावसाहेब शेजारच्या पिकात गेले. पहाटे अचानक अवतीभवती गलका सुरू झाल्याने रावसाहेबांना जाग आली. बोर्डिंगमध्ये आल्याआल्या त्यांना कळले, की त्यांचा मित्र विश्वनाथ रेवगडे याला साप चावला होता. जमिनीला असलेल्या एका मोठ्या भेगेतून एक साप वर आला होता व झोपलेल्या विश्वनाथच्या हाताला त्याने दंश केला होता. विश्वनाथ वेदनेने किंचाळल्यावर आजूबाजूला झोपलेले साठ-सत्तर विद्यार्थी खडबडून जागे झाले. त्यांनी तो साप मारला व विश्वनाथला एका दरवाखान्यात नेले. तो साप विषारी असावा अशी सगळ्यांना भीती होती आणि थोडेफार उपचार केल्यानंतर ती खरी असल्याचे स्पष्ट झाले. दवाखान्यात नेल्यावर त्याला डॉक्टरांनीही इंजेक्शन वगैरे दिले पण दुर्दैवाने कुठलाच इलाज लागू पडला नाही व अखेर विश्वनाथ मरण पावला. सगळे सुन्न झाले. रावसाहेबांवर तर कुन्हाडच कोसळल्यासारखे झाले. विश्वनाथ हा रावसाहेबांच्याच पाडळी गावचा. त्याची आई चंद्रभागाकाकू विधवा होती. विश्वनाथ त्यांचा एकुलता एक मुलगा. बोर्डिंग सुरू करण्यापूर्वी रावसाहेब जेव्हा मुले गोळा करत होते तेव्हा ते पाडळीला जाऊन चंद्रभागाकाकूंनाही भेटले होते. पण आपल्या एकुलत्या एका मुलाला लांब बोर्डिंगमध्ये पाठवायला त्यांचा खूप विरोध होता. पण रावसाहेबांनी तिला समजावले. "शिकून तो मोठा होईल, नाव काढेल. इथे ठेवण्यापेक्षा त्याला बोर्डिंगमध्ये पाठवा," असे सांगितले. त्यांच्या सांगण्यावर विश्वास ठेवून चंद्रभागाकाकू तयार झाल्या; विश्वनाथला त्यांनी संगमनेरला बोर्डिंगमध्ये पाठवले. भविष्याविषयीच्या त्यांच्या सगळ्या आशा विश्वनाथवरच केंद्रित झाल्या होत्या आणि आता एकाएकी नियतीने असा घाला घातला होता. चंद्रभागाकाकूंना हे कसे कळवायचे? त्यांची काय अवस्था होईल ? नुसत्या कल्पनेनेच रावसाहेबांच्या काळजाचे पाणी होत होते. पोलिसांनी पकडू नये म्हणून ते लपून राहतच होते; पण आता त्यांना तोंडही लपवावेसे वाटू लागले. आपल्यावर विश्वास टाकल्यामुळेच चंद्रभागाकाकूंना त्यांचा एकुलता एक मुलगा गमवावा लागला या भावनेने त्यांना खूप अपराधी वाटू लागले. रावसाहेबांच्या शोकावेगाला आणखीही एक सूक्ष्मसा पण खोलवर झोंबणारा असा पदर होता. शिंदे घराण्यात नागाचे खूप प्रस्थ होते. त्यांच्या घराण्यात साप मारायला पूर्वापार बंदी होती. त्यांच्या देव्हाऱ्यातही नागोबा असे. शिंद्यांची कुळी अजुनी चालतोची वाट... १०२