पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/१०१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पण त्यादृष्टीने काही हालचाल करायच्या आतच रावसाहेबांची तब्येत एकाएकी खालावली. त्यावेळी डोकेदुखी थांबावी म्हणून त्यांनी अॅस्प्रो किंवा तशाच कुठल्यातरी वेदनाशामक गोळ्या अती प्रमाणात घेतल्या असाव्यात. सतत होणाऱ्या उलट्या आणि जुलाब यांनी ते हैराण झाले. भांडीच्या भांडी भरावीत इतके द्रव शरीरातून जाऊ लागले. अंगात त्राण म्हणून राहिले नाही. पाडळीहून बैलगाडीत घालून त्यांना संगमनेरमध्ये आणले गेले. सोबत त्यांचे वडील होते, तसेच भाऊसाहेबांचे वडील, जोर्व्याचे दादा पाटील, हेही होते. संगमनेरमध्ये राहायची सोय दादा पाटलांनीच केली होती. डॉ. बी. जी. गाडगीळांचे उपचार सुरू झाले. ते जगतील याविषयी खुद्द डॉक्टरांनाही खात्री नव्हती. पण त्यांनी प्रयत्नांची शर्थ केली. चळवळीतल्या तरुणांविषयी त्यांना खूप सहानुभूती होती. समाजाचाही त्यांच्यावर खूप विश्वास होता. त्यांना प्रेमाने 'मामा' म्हणूनच संबोधले जाई. सुदैवाने त्यांच्या प्रयत्नांना हळूहळू का होईना पण यश आले. रावसाहेब म्हणतात, "माझ्यावर गाडगीळमामांनी अगदी मनापासून उपचार केले. नशिबानेही साथ दिली. मरता मरता मी वाचलो. खरे तर सर्वांनी आशाच सोडली होती. माझा जणू पुनर्जन्मच झाला. ' }} आता नव्या उमेदीने रावसाहेबांच्या पुढील सर्व हालचाली सुरू झाल्या. पुढची दोन वर्षे कॉलेजशिक्षणात गेली. त्या दरम्यान त्यांची कम्युनिस्ट चळवळ चालूच होती. त्या चळवळीचाच एक भाग म्हणून पुढे त्यांना सुमारे तीन वर्षे भूमिगतही राहावे लागले. हे सगळे करत असताना शिंदे बोर्डिंगकडेही रावसाहेब लक्ष देतच होते. पण मग एक वेळ अशी आली, की शिंदे बोर्डिंगचे काम थांबले. काळाच्या ओघात हे केव्हा ना केव्हा घडणे अपरिहार्यच होते. एका अगदी अनपेक्षित आणि दुर्दैवी घटनेमुळे तो क्षण अवचितच आला. १९४८ सालच्या श्रावण महिन्यातली ही घटना. इंग्रजी कॅलेंडरनुसार तेव्हा बहुधा ऑगस्ट महिना असावा. नागपंचमीची रात्र. रावसाहेब बोर्डिंगमध्ये आले होते. त्या काळी भूमिगत असल्यामुळे एक-दोन दिवसांपेक्षा अधिक काळ त्यांना तिथे राहता येत नसे. पण बोर्डिंगचे कामकाज ठीक चालले आहे ना ते बघायला तेवढा वेळ पुरेसा होता. विद्यार्थ्यांना तसे उत्तम प्रशिक्षण मिळाले होते व सगळी कामे ते सुरळीतपणे पार पाडतच असत. पण या निमित्ताने त्यांच्याबरोबर काही तास घालवायची, त्यांना चळवळीची माहिती द्यायची, त्यांचे प्रबोधन करायची संधी मिळायची. रावसाहेब ती सहसा कधी सोडत नसत. विद्यार्थ्यांनाही त्यांच्याविषयी खूप आदर वाटे; त्यांच्या दृष्टीनेही ती एक पर्वणीच होती. रात्री झोपायला मात्र शिंदे बोर्डिंग... १०१