पान:अकबर १९०८.pdf/२१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
अकबर.

१७

म्हणाला, हा तर आपण आपल्या सांप्रत गादीवर असलेल्या राजाचा आणि त्याचे वडील बंधु नंदिगुप्त महाराज यांचा वृत्तांत वर्णन केलांत ? हा वृत्तांत मी काय पण काश्मीर देशांतील प्रत्येक व्यक्ति जाणत आहे. "
 कुल्लुक - तुझें म्हणणें बरोबर आहे. मीं जो वृत्तांत तुला सांगितला तो सर्वांना माहीत आहे. परंतु, महाराज नंदिगुप्त विरुद्ध मंड- ळींच्या हाती लागले नाहींत, अगर मारले गेले नाहींत. किंवा राज्यांतून हाकूनही दिले गेले नाहींत, ही गोष्ट मात्र जाणणारे विरळा. महाराजांनी केवळ स्वेच्छेनें आपल्या बंधूस न समजूं देतां देशत्याग केला आणि दोघां विश्वासपात्र मित्रांना मात्र तें कोठें राहतात तें माहीत आहे. त्यांनीं दूर एकांतस्थानीं आपला आश्रम बनवून देशांत अफवा उडविली कीं, ते मारले गेले. अशा रीतीनें त्यांनीं धाकट्या भावाचा प्राण बांचवून देशा- सही नष्ट होण्यापासून बचाविलें.
 सिद्धरामानें आश्चर्ययुक्त होऊन विचारिलें, नंदिगुप्त अद्याप जिवंत असून तेच -  कुल्लुकनें मध्येंच लडलें, “ बरोबर, तुझें अनुमान बरोबर आहे. आपण आतांच त्या योगिराजांस भेटून आलों. परंतु, हा भेद अत्यंत गुप्त ठेविला पाहिजे. आपला देश आणि आपले महाराज यांचें हें गुह्य केवळ तुझ्या विश्वासावर तुला श्रुत केलें आहे. याचा हेतू इतकांच कीं, तूं त्यांच्या विश्वासू सेवक मित्राचा पुत्र आहेस. तुला ही गोष्ट कळविणें अवश्यच होतें. झालें. तूं स्वतः बुद्धिमान आहेसच. जास्त सांगणें व्यर्थ आहे. "
 सिद्धरामानें किंचित् नाखुष वृत्तीनें झटलें, “ ही गोष्ट आपण मला तेथेंच कां बरें सांगितली नाहीं ? महाराजांनीं राज्यपदावर असतां माझ्या पित्यावर आणि आमच्या वंशावर जी कृपा केली, तिजबद्दल मला त्यांना धन्यवाद देण्याचा उत्तम अवसर मिळाला होता. अथवा केलें तें ठीकच केलें. कारण, खुद्द त्यांनींच ज्याअर्थी त्यावेळीं ही गोष्ट प्रकाशित केली नाहीं, त्याअर्थी आपणासही तसें करणें उचित झालें नसतें. असो, मला पुन्हांही अवसर मिळेल. कारण, योगिराज गुरुपदांनी कृपा करून वचन दिलें आहे कीं, सम- यवशात मजवर कांहीं बिकट प्रसंग येऊन कोणाच्या उपदेशाची अवश्य-