पान:अकबर १९०८.pdf/१७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
अकबर-

१३

पणें अवगत आहे. जें काम करण्याकरितां तूं जात आहेस, त्या कामाशीं तुझा संबंध झाल्यावर तें कामच तुला त्यासंबंधाच्या अवशिष्ट गोष्टी शिक-- वील. तथापि, एक गोष्ट मी तुला सांगून ठेवितों, ती ही कीं, तूं जेव्हां आम्रा येथील राजकीय आणि वैभवयुक्त दरबारी प्रवेश करशील, तेव्हां समयानुसार तुला उचित वाटणाऱ्या गोष्टींत' मन घालण्यास भिऊं नको. त्यांत तुला सत्यासत्याचा निर्णय करण्यास अवसर मिळेल. तुझ्या गुरूने ज्या कांहीं तुला उपदेशाच्या गोष्टी सांगितल्या असतील, त्या सर्वदां ध्यानांत वागवून आपलें अंत:- करण सदां निर्मळ ठेव आणि तुझ्या कोणत्याही कृत्यापासून तुला अथवा दुसऱ्या कोणाला लज्जित व्हावे लागणार नाहीं अशा तन्हेनें वाग- ण्याविषयीं विशेष सावध रहा. शेवटीं इतकेंच सांगावयाचें कीं, आह्मां दोघांच्या उपदेशानुरूप सावधानपणानें वर्तन करीत असतांही जर तुज- वर कांहीं संकट येऊन पडलें आणि त्यावेळीं कोणापाशीं आपलें हृदय उघडें करण्याची तुला अवश्यकता वाटली, तर तुझा पिता आणि गुरु कुल्लुक यांच्या या मित्राचें स्मरण करून येथवर येण्यास चुकू नको- काय ? याबद्दल प्रतिज्ञा करतोस ना ?
 योगिराजांच्या उपदेशानें प्रसन्नचित्त होऊन सिद्धरामानें अत्यंत विनयाने आणि गांभीर्यानें उत्तर दिलें 'पूज्यवर, आपली आज्ञा शिरो- धार्य आहे. आपल्या सदुपदेशाप्रमाणें वागण्याविषयीं मी निरंतर दृढ- प्रतिज्ञ राहीन.
'  इतक्यांत सेवकांनींही घोडे कसून पुढें आणिले. तेव्हां कुल्लुक आणि सिध्दराम यांनी गुरुपदांस प्रणाम करून त्यांचा आशीर्वाद घेत- ल्यावर ते आश्वारूढ होऊन मार्गस्थ झाले. दोघे सेवकही आपा- पल्या तट्टांवर बसून त्यांच्या मागोमाग निघाले. थोडक्याच वेळांत गुरुपदांच्या आश्रमाची हद्द सुटून ते पुन्हां अरण्यचारी बनले.
 आश्रमांतून निघाल्यावर सिद्धरामानें पुनः पुनः मार्गे वळून पाहिलें तों गुरुपद कुटीच्या द्वारीं सिंहाच्या मस्तकावर हात ठेऊन आपल्याकडेच एकसारखें टक लावून पहात उभे आहेत, असें त्याच्या दृष्टीस पडलें. कांहींसें दूर गेल्यावर जेव्हां ती गुरुपदांची गंभीर छबी दिसेनाशी झाली,