पान:अंतरिक्षातील चमत्कार.pdf/९१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१२६ अंतरिक्षांतील चमत्कार. यानंतर लवकरच या १९ व्या शतकाच्या पहिलेच दिवशीं ह्मणजे सन १८०१ च्या जानुआरीचे पहिल्या तारखेस पियाझी या नामांकित इटालियन ज्योतिष्यास सीरीस हा लघुग्रह दिसला. या नवीन सांपडलेल्या ग्रहाचा वेध घेऊन पाहतां, असें स्पष्ट दिसून आलें कीं, हा ग्रह मंगळ आणि गुरु यांच्यामध्यें आहे, आणि याचें सूर्यापा- सून अंतर २६ कोटि मैल येतें; ह्मणजे पृथ्वीचें अंतर जर १० कोटि धरलें, तर या नवीन सांपडलेल्या लघु ग्रहाचें अंतर बरोबर २८ कोटि येईल. हा ग्रह सांपडल्यामुळे वर सांगितलेली आंकड्यांची माला पूर्ण झाली ! हा गणितशा- स्त्राचा एक मोठा चमत्कार होय. मंगळ व गुरु यांच्यामधील हा इतके दिवस न सांपडलेला ग्रह शोधून काढल्यावरून पियाझी याची कीर्ति सर्व जगभर पसरली, आणि या शोधानें या शतकाचा पहिला दिवस ज्योतिषशास्त्राच्या इतिहासांत मोठा प्रसिद्ध झाला. सीरीस ग्रहाचा शोध लागल्यावर पुढे लवकरच सात वर्षांचे आंत प्यालास, ज्यूनो व व्हेस्टा हे ग्रह ज्योतिष्यांस सांप- डले. हे नवीन सांपडलेले चार ग्रह पूर्वी माहीत असलेल्या सात ग्रहांपेक्षां फारच लहान आहेत. आणि ह्मणूनच यांस लघुग्रह अशी संज्ञा दिली आहे. पुढे सन १८४५ पर्यंत एकहि नवीन लघुग्रह सांपडला नाहीं. परंतु, सन १८४५ या वर्षानंतर पुष्कळच नवीन लघुग्रहांचा शोध लागला आहे.