पान:अंतरिक्षातील चमत्कार.pdf/१३७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१६८ अंतरिक्षांतील चमत्कार. आपल्या येथल्यापेक्षां नेप्च्यूनवर सूर्याचें बिंब केवढेंसें दिसतें हैं या ३० व्या आकृतीवरून सहज लक्षांत येईल. सूर्यापासून नेप्च्यूनचें अंतर पृथ्वीपेक्षां ३० पट अधिक असल्यामुळे, सूर्याचा आकार नेप्च्यूनवरून येथल्यापेक्षां९० पट लहान दिसतो, व तेथें प्रकाश व उष्णता हीं ९०० पट कमी पोंचतात. ह्मणजे पृथ्वीवर सूर्याची उष्णता जर ९०० अंश येते अशी क्षणभर कल्पना केली, तर नेपच्यूनला सूर्याची उष्णता फक्त १ अंश मिळते असे समजावयाचें ! यावरून, सूर्यमालेंतील या शेवटल्या ग्रहावर सूर्याच्या उष्णतेपासून फारसा उपयोग होत असेल असे वाटत नाहीं. तथापि, इत- क्यावरून नेप्च्यूनवर प्राण्यांची वस्ति नाहीं असें मात्र आपणांस ह्मणतां येणार नाहीं. कांहीं दिवसांपूर्वी सर्व विद्वान् लोकांचा असा समज होता कीं, समुद्राच्या तळाशी कोणताहि प्राणी क्षणभर सुद्धां जिवंत राहू शकणार नाहीं. कारण, तेथें पाण्याचा दाब फार मोठा असणार व सूर्यप्रकाशहि अतिशय सूक्ष्म असणार. परंतु अलीकडील शोधांवरून अशी पक्की खात्री झाली आहे कीं, महासागराच्या खोल उदरांत सुद्धां असंख्य प्राण्यांच्या व वनस्पतींच्या अनेक जाती आहेत! फार कशाला, या पृथ्वीवरच अशी किंचित् तरी जागा सांपडेल काय, की जेथें 'जिऊबाईचीं लेंकरें' मुळींच नाहींत? मग, अंतरिक्षांतील अन्य प्रदेशीं कोणत्याहि प्रकारचे प्राणी असूं शकणार नाहीत, असें ह्मणण्याचें धाडस कसें करितां येईल ?