पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/८९

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

आपापसातील लढाया, त्यांचे पराक्रम ह्या सगळ्यांनी भरलेल्या इतिहासात त्या सामान्य शेतकऱ्याची काहीच नोंद होत नव्हती. होणारही नव्हती. माणसाचा स्वतःच्या प्रयत्नावरचा सगळा विश्वास उडून जावा व अपरिहार्यपणे, केवळ जगण्यापुरते तरी बळ मिळावे म्हणून त्याने दैववादी बनावे, ठेविले अनंते तैसेची राहावे' हाच आदर्श समोर ठेवून गेला दिवस तो आपला समजत जगावे, अशीच एकूण परिस्थिती होती. पिढ्यानपिढ्या हे असेच चालत आले होते व त्या संचितातूनच शेतकऱ्याची विशिष्ट मानसिकता घडत गेली होती.
 भामा ही इथली प्रमुख नदी. वांद्रे गावाजवळ ती उगम पावते व पुढे भीमा नदीला मिळते. भामा नदीवर जवळच आसखेड धरण आहे. चाकण हे एक टोक पकडले तर वांद्रे गाव हे दुसरे टोक. वांद्र्याच्या पलीकडे रायगड जिल्हा सुरू होतो. वांद्रे व चाकण या दोन टोकांमधले अंतर ६४ किलोमीटर. ह्या भागाला भामनहरचे (किंवा भामनेरचे) खोरे असे म्हटले जाते व याच रस्त्यावर चाकणपासून सात किलोमीटरवरचे आंबेठाण हे एक छोटेसे गाव. इथला सगळा परिसर डोंगराळ. कांदे, बटाटे, ज्वारी आणि भुईमूग ही मुख्य पिके; खोऱ्याचा वांद्र्याजवळचा जो भाग आहे तिथे पाऊस जास्त पडत असल्याने भाताचे पीक घेतले जायचे.

 रोज सकाळी सहा वाजता औंधमधील आपल्या घरून जोशी स्कूटरवरून निघायचे आणि ४० किलोमीटरवर असलेल्या आंबेठाणला सकाळी सातपर्यंत पोचायचे. कधी कधी लीलाताईदेखील सोबत येत. अशावेळी ते आपली महिंद्रची पांढरी जीप गाडी आणत. संध्याकाळी काळोख पडला की औंधला परतत. दिवसभर शेतीचे काम करता करता जमेल तेव्हा इतर गावकऱ्यांशी संवाद साधत, त्यांची शेती अभ्यासत.

 आधी त्यांनी जमिनीला कंपाऊंड घालायचे काम हाती घेतले. दोन बाजूंना भिंत, तिसऱ्या बाजूला तार व चौथ्या बाजूला घायपात. घायपात म्हणजे निवडुंगासारखी बांधावर लावली जाणारी झाडे, ह्याची पाने शेळ्या-बकऱ्या खात नसल्याने ती दीर्घकाळ टिकतात व त्यांच्यापासून भाजीच्या जुड्या वगैरे बांधायला लागणारा जाडसर धागा मिळतो. हे असले ज्ञान प्रत्यक्ष शेतीत उतरल्यावरच जोशींना मिळाले. इथली बहुतेक जमीन उंचसखल, खडकांनी भरलेली अशी होती; किंबहुना म्हणूनच ती त्यांना स्वस्तात मिळू शकली होती. कित्येक वर्षे तिथे कुठलेच पीक घेतले गेले नव्हते. शेतीसाठी ती सर्वप्रथम नीट सपाट (लेव्हल) करून घेणे आवश्यक होते. पाणी उपलब्ध व्हावे म्हणून त्यांनी दोन विहिरीही खणायला घेतल्या. सुदैवाने पाणी चांगले लागले. पाइपाने पाणी सगळीकडे खेळवायचीही व्यवस्था केली. जमिनीवर दोन खोल्यांचे स्वतःसाठी एक घर बांधले. घराशिवाय एक सामानाची खोली होती, शेतीची अवजारे, खते व तयार शेतमाल ठेवायला मोठी शेड होती. म्हशी पाळायचा त्यांचा विचार होता व त्यासाठी गोठाही बांधायला घेतला. वीज महामंडळाकडे अनेक चकरा टाकून विजेची जोडणी करवली. अडचणीच्या वेळी अत्यावश्यक म्हणून टेलिफोनचीही सोय करून घेतली. त्या परिसरातले ते पहिले टेलिफोन कनेक्शन, शून्यातूनच सगळी सुरुवात करायची म्हटल्यावर एकूण प्रकरण तसे अवघडच होते; विशेषतः यावेळी जोशींची चाळिशी उलटलेली

मातीत पाय रोवताना८९