पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/८८

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

पतिपत्नी त्यांच्याबरोबर पुन्हा आंबेठाणला गेले. त्या जमिनीच्या बरोबर समोर तुकाराम महाराजांचा भामचंद्राचा डोंगर होता- जिथे ते चिंतन करायला एकांतात बसत. त्या डोंगराला एक विशिष्ट उंचवटा आहे. योगायोग म्हणजे बर्नमधल्या जोशींच्या घराजवळ जो गानट्र नावाच्या डोंगराचा भाग होता, अगदी तसाच तो उंचवटा दिसत होता. जोशीना एकदम तो जागा आवडली. या डोंगराच्या गानटशी असलेल्या साधामळे इथेच शेती करायचा योग आपल्या आयुष्यात आहे असे काहीतरी त्यांना वाटले. लगेचच त्या शेतकऱ्याने सांगितलेली किंमत जोशींनी चुकती केली व ती शेतजमीन विकत घेतली. १ जानेवारी १९७७ रोजी.
 ही एकूण साडेतेवीस एकर जमीन होती. त्या जागेचे नाव जोशींनी 'अंगारमळा' असे ठेवले. 'क्रांतीचा जयजयकार' ही कुसुमाग्रजांची कविता जोशींच्या खूप आवडीची. त्याच कवितेतील 'एकच तारा समोर आणिक पायतळी अंगार, होता पायतळी अंगार' ह्या ओळीवरून हे नाव त्यांना सुचले. पुढील आयुष्यात त्या जागी जोशींची जी वाटचाल झाली त्यातील दाहकता विचारात घेता हे नाव अगदी समर्पक ठरले असेच म्हणावे लागेल.
 सरकारी नियमानुसार जो शेतकरी नाही त्याला शेतजमीन विकत घेता येणे आजच्याप्रमाणे त्याकाळीही अतिशय अवघड होते. पण प्रत्येक कायद्याला काही ना काही पळवाटा असतातच. ५ जुलै २००१ रोजी 'दैनिक लोकमत'मधील आपल्या एका लेखात त्यांनी लिहिले आहे,

मी सरकारी नोकरीत असताना रिझर्व्ह बँकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांशी ओळख झाली होती. त्यांचे चिरंजीव आयएएस पास होऊन प्रांत म्हणून काम बघत होते. त्यांच्या मदतीने मार्ग सापडला.

 कोकणातला रायगड जिल्हा आणि पुणे जिल्हा यांच्या सीमेवरच्या खेड तालुक्यातील चाकण हे गाव. शिवाजी महाराजांनी बारा मावळांपासून स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली. चाकण हे या मावळ मुलुखाचे प्रवेशद्वार. इथलेच लढवय्ये मावळे त्यांचे जिवाभावाचे सोबती.
 असे ऐतिहासिक महत्त्वाचे गाव असूनही इथला सामान्य शेतकरी मात्र कमालीच गांजलेला होता. दुष्काळातील त्याच्या दुःखाचे हृदयस्पर्शी वर्णन तुकाराम महाराजांनी केलेले आहे; पण दुष्काळ नसतानाही त्याची परिस्थिती फारशी काही वेगळी नसायची.

 इथे सतत लढाया चालू असत. कधी दिल्लीचे मोगल आक्रमण करत तर कधी विजापूरच्या अदिलशहाचे सरदार, कधी सिद्धी जोहरचे सैनिक तर कधी पेंढाऱ्यांचे लहानमोठे हल्ले. प्रत्येक स्वारीत उभी पिके कापली जात, गावे लुटली जात, अगदी बेचिराख केली जात. आक्रमक कोणीही असला तरी शेतकऱ्याचे हाल सर्वाधिक असत. त्याचे घरदार, बैलनांगर, बी-बियाणे, पाण्याची व्यवस्था सारे नष्ट होऊन जाई. पुन्हा त्याला शून्यातून सुरुवात करावी लागे आणि जे नव्याने उभारायचे तेही कधी लुटले जाईल ह्याचा काहीच नेम नसायचा. स्थैर्याच्या पूर्ण अभावामुळे मोठे असे काही उभारायची, भविष्यासाठी बचत करायची, संपत्ती निर्माण करायची सारी प्रेरणाच नाहीशी होऊन जायची. राजेमहाराजांच्या स्वाऱ्या, त्यांच्या

८८अंगारवाटा... शोध शरद जोशींचा