पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/८६

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


मान तुकवली होती. अशा परिस्थितीत त्यांना अमान्य असलेल्या शाळेत घालून अधिक नाराज करणे वडलांना परवडणारे नव्हते. पाचगणीच्या शाळेत मुलींना घालायचा इरादा त्यांना सोडून द्यावा लागला.
 पुण्याला परतल्यावर दुसऱ्याच दिवशी पाषाण भागात असलेली सेंट जोसेफ ही जुनी कॉन्व्हेंट शाळा ते बघायला गेले व ती त्यांना चांगली वाटली. शिक्षणखात्याच्या कार्यालयात तीन चार चकरा टाकल्यावर इथे प्रवेश मिळू शकेल हे तेथील अधिकाऱ्यांकडून कळले. शाळेच्या स्वतःच्या बसेस होत्या व कधी गरज पडली तर घरापासून पायीसुद्धा पंधरा-वीस मिनिटांत जाता येईल इतकी ती जवळ होती. विशेष म्हणजे तिथे फ्रेंच हा विषय होता. त्याच शाळेत मग मुलींचे नाव घातले गेले.

 हे सगळे होत असतानाच एकीकडे त्यांनी शेतीसाठी जमिनीचा शोधही सुरू केला होता. पूर्णतः पावसावर अवलंबून असलेली कोरडवाहू जमीनच घ्यायची हे त्यांनी परदेशात असतानाच नक्की केले होते. त्यांची आई व अन्य भावंडे ह्यांना जोशी करत होते तो कमालीचा विक्षिप्तपणा वाटत होता. मुळात त्यांच्या खानदानात कधी कोणी शेती केलीच नव्हती. पण त्यांनी 'तुला काय योग्य वाटेल ते कर' अशीच भूमिका घेतली. एकदा आपल्या शरदने एखादी गोष्ट ठरवली, की ती केल्याशिवाय तो कधीच राहणार नाही हे घरच्यांना चांगले ठाऊक होते. आश्चर्य म्हणजे, अन्य जवळ जवळ कोणीच त्यांच्या उपक्रमाबद्दल फारसे कुतूहल दाखवलेच नाही! म्हणजे उत्तेजनहीं दिले नाही आणि टीकाही केली नाही. हा शहरी मध्यमवर्गीय अलिप्तपणा म्हणायचा की काय कोण जाणे!
 नात्यागोत्यांतल्या बहुतेकांनी दाखवलेल्या या अलिप्ततेच्या अगदी उलट अनुभव म्हणजे रावसाहेब शेंबेकर यांच्याशी झालेली भेट, तशी त्यांची काहीच पूर्वओळख नव्हती. कोणाकडून तरी त्यांनी जोशीविषयी ऐकले व कुतूहल वाटून ते खास त्यांना भेटायला म्हणून पुण्याला आले. शेंबेकर यांची स्वतःचीही उसाची बरीच शेती होती. ते म्हणाले, "बागायती शेतीतूनही शेवटी शेतकऱ्याच्या पदरी तोटाच येतो. हे मी माझ्या अनुभवातून सांगतोय. नाहीतरी तुम्हाला प्रयोगच करायचा आहे ना? मग त्यासाठी बागायती शेती का नाही घेत? हवं तर मीच माझ्या जमिनीचा एक चांगला तुकडा तुम्हाला प्रयोगासाठी देतो. त्याचे तुम्ही मला काहीही पैसे देऊ नका." खरेतर ह्या भल्या गृहस्थाने आपणहून दिलेला सल्ला अगदी योग्य असाच होता. शिवाय सोबत प्रत्यक्ष मदतीचे अत्यंत दुर्मिळ व ठोस असे आश्वासनहीं होते; पण जोशींनी तो जुमानला नाही; आपला कोरडवाहू शेतीचा आग्रह सोडला नाही. बऱ्याच वर्षांनी, २० जून २००१ रोजी, 'दैनिक लोकमत'मध्ये लिहिलेल्या आपल्या एका लेखात ते म्हणतात,

शक्य तितक्या सौजन्याने मी रावसाहेब शेंबेकरांना काढून लावले. कोरडवाहू कातळात पाणी शोधण्याच्या आणि शेती फुलवण्याच्या कामात गढून गेलो.

८६अंगारवाटा... शोध शरद जोशींचा