पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/८५

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

खूणगाठ त्या पहिल्या संध्याकाळीच त्यांनी मनाशी पक्की बांधली.
 पुण्याला पोचल्यावर रेल्वेस्टेशनवरून ते सहकुटुंब डेक्कनवर श्रेयस हॉटेलात गेले. इथल्या दोन खोल्या त्यांनी पूर्वीच आरक्षित करून ठेवल्या होत्या. आईसमवेत सदिच्छा बंगल्यात न राहता स्वतःचे वेगळे घरच विकत घ्यायचे व ते सापडेस्तोवरदेखील हॉटेलातच राहायचे जोशींनी ठरवले होते. त्यादृष्टीने थोडीफार चौकशी त्यांनी स्वित्झर्लंडमध्ये असतानाच करून ठेवली होती.
 त्याप्रमाणे ते लगेच कामाला लागले. सहाएक आठवड्यांतच एक बंगला त्यांनी खरेदी केला. औंध येथील सिंध सोसायटीत ७०५ क्रमांकाचा. तीन बेडरूम्स असलेला. शिवाय पुढेमागे थोडी बाग होती. परिसर निवांत होता. मालक एक शाळामास्तर होते. त्याकाळी पुण्यापासून लांब समजल्या जाणाऱ्या औंधसारख्या ठिकाणी घरे बऱ्यापैकी स्वस्तात उपलब्ध होती. घराचे नाव त्यांनी मृद्गंध ठेवले. त्या नावाचा विंदा करंदीकर यांचा कवितासंग्रह प्रसिद्ध होता व शिवाय त्या शब्दातच काव्यात्मकता होती. जोशींसारख्या कविताप्रेमीला तो शब्द भावला. त्यांनी बंगला घेतला त्यावेळी पावसाळा नुकताच सुरू झाला होता व औंध परिसरात तेव्हा बऱ्याच शेतजमिनी असल्याने खूपदा हवेत हवाहवासा वाटणारा मृद्गंध दाटून येई, हेदेखील त्यामागचे कदाचित एक कारण असू शकेल.

 पुढच्या काही दिवसांत बोटीने येणारे त्यांचे सामानही येऊन पोचले. ते नीट लावण्यात बराच वेळ गेला. 'बर्नमधल्या माझ्या खोलीत जे सामान आहे, ते सगळंच्या सगळं पुण्यातल्या माझ्या खोलीत असलं, तरच मी पुण्याला येईन, अशी धाकट्या गौरीची अटच होती. नव्या जागी वास्तव्य सुरू करायचे म्हणजे धावपळ तर अपरिहार्यच होती. शहरापासून इतक्या लांब त्यावेळी सार्वजनिक वाहनव्यवस्था नव्हती; दिवसभरात जेमतेम सात-आठ बसेस औंधमार्गे पिंपरी-चिंचवडकडे जायच्या. शिवाय बहुतेक सगळ्या खरेदीकरिता डेक्कनला जावे लागे. त्यामुळे त्यांनी लगेचच स्वतःसाठी एक लॅम्ब्रेटा स्कूटर घेतली व सहकुटुंब कुठे जाता यावे म्हणून काही दिवसांनी एक सेकंडहँड जीप गाडीही खरेदी केली..

 घर शोधत असतानाच मुलींसाठी चांगली शाळा कुठे मिळेल याचाही शोध चालूच होता. कारण ते अगदी शाळा सुरू व्हायचेच दिवस होते. स्वित्झर्लंडमध्ये दोन्ही मुलींना इतर विषयांबरोबरच फ्रेंच, जर्मन व लॅटिन हे तीन विषय होते; इथे पुण्यात मात्र त्याऐवजी इंग्रजी, हिंदी व मराठी हे विषय होते. पाचगणीला एका मुलींच्या प्रख्यात निवासी शाळेत फ्रेंच हा विषय अभ्यासक्रमात आहे असे त्यांनी ऐकले होते व नव्या शाळेतला एकतरी विषय मुलींना चांगला येणारा असावा म्हणून एकदा सगळे पाचगणीला जाऊनही आले. शाळेला मैदान वगैरे उत्तम होते, इमारत प्रशस्त होती, पण निवासव्यवस्था दाटीवाटीची व अस्वच्छ होती – निदान नुकतेच स्वित्झर्लंडहून आलेल्यांच्या दृष्टीनेतरी. 'आम्ही ह्या असल्या डॉर्मिटरीमध्ये चार दिवससुद्धा राहू शकणार नाही' असे दोन्ही मुलींनी स्पष्ट सांगितले. मुळात भारतात परत यायचा वडलांचा निर्णय मुलींना मनापासून मान्य नव्हताच; कशीबशी वडलांच्या आग्रहापुढे त्यांनी

मातीत पाय रोवताना८५