पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/७८

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.


 व्यक्तिगत पातळीवरील आणखी एक निरीक्षण त्यांना चीड आणत असे. आपल्या इतर युरोपियन सहकाऱ्यांपेक्षा आपण अधिक कर्तबगार आहोत अशी जोशी यांची खात्री होती. पण त्याचवेळी भारतीय म्हणजे गरीब लोक, हा मागासलेला देश, आपण ह्यांना मदत केली पाहिजे, त्यांचा विकास करायला पाहिजे अशा प्रकारची एक वडिलकीची (patronizing) भावना पाश्चात्त्य समाजात त्यांना खूपदा आढळायची. व्यक्तिशः आपल्याकडे बघण्याची पाश्चात्त्यांची दृष्टीही तशीच अहंगंडातून आलेली आहे असे त्यांना जाणवायचे. ह्या भावनेतून येणारा पाश्चात्त्यांचा दातृत्वाचा आविर्भाव त्यांना चीड आणायचा; त्यांच्यातील प्रखर आत्मभानाला म्हणा किंवा अस्मितेला म्हणा तो कुठेतरी डंख करणारा होता.
 मागे लिहिल्याप्रमाणे आपण कोणीतरी मोठे व्हावे, जगावेगळे काहीतरी करून दाखवावे अशी एक महत्त्वाकांक्षा जोशी ह्यांच्या मनात लहानपणापासून होतीच. भारतातील पोस्टखात्यात उच्चपदी असतानाही ह्या महत्त्वाकांक्षेने त्यांची पाठ सोडली नव्हती. स्वित्झर्लंडमध्ये राहताना बाकी सगळे असूनही ह्या मूलगामी महत्त्वाकांक्षेच्या पूर्ततेच्या दृष्टीने काहीच घडत नव्हते, घडणे शक्यही वाटत नव्हते. शेवटी भारत हीच आपली कर्मभूमी असायला हवी, इथे आपले आयुष्य फुकट चालले आहे, ही जाणीव त्यांच्या मनात त्यावेळी निर्माण झाली असणे सहजशक्य आहे.
 टोनी म्हणाले,
 "एक दिवस आपला मालकीचा फ्लॅट विकून टाकायचा व बर्नमध्ये भाड्याचं घर घेऊन राहायचा निर्णय त्याने घेतला. हे त्याने जेव्हा मला सांगितलं, तेव्हाच भारतात परतायचा त्याचा निर्णय पक्का झाला आहे, हे माझ्या लक्षात आलं. आणि एकदा त्याच्या मनानं एखादी गोष्ट घेतली, की त्याचं मन वळवणं अवघड नव्हे तर अशक्य आहे, हे आठ वर्षांच्या सहवासात मला कळून चुकलं होतं."

 भारतात प्रत्यक्ष परतायच्या काही वर्षे पूर्वीच तसे करायचा सुस्पष्ट विचार जोशी यांच्या मनात आकाराला आला होता हे स्पष्ट करणारी काही कागदपत्रे उपलब्ध आहेत.
 उदाहरणार्थ, मार्च १९७४ मध्ये हैद्राबाद येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ कम्युनिटी डेव्हलपमेंट या संस्थेच्या संचालकांबरोबर झालेला त्यांचा पत्रव्यवहार उपलब्ध आहे. त्यानुसार त्या संस्थेने स्वत:च्या जर्नलच्या वर्गणीचे म्हणून पाठवलेले सहा पौंडांचे बिलही उपलब्ध आहे. आपल्या पत्रात १५ जुलै ते ३१ डिसेंबर १९७४ या कालावधीत संस्थेचा कोर्स करायची इच्छाही जोशींनी व्यक्त केली आहे.

 राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे उपकुलगुरू डॉ. एम. एस. ऊर्फ नानासाहेब पवार यांना जोशींनी लिहिलेले पत्र व त्याला नानासाहेब पवार यांनी दिलेले उत्तरही उपलब्ध आहे. त्या पत्रात भारतातील शेतीचा अभ्यास करायची इच्छा जोशींनी व्यक्त केली आहे व उत्तरात पवार यांनी त्यांना मार्गदर्शनही केलेले आहे. "आमचे एक प्राध्यापक डॉ एस. एस. थोरात पुणे कृषी महाविद्यालयात आहेत व त्यांच्याबरोबर १५ जुलै ते ३१ डिसेंबर या

७८अंगारवाटा... शोध शरद जोशींचा