पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/७७

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.


१९७२च्या सुमारास माझ्या मनात भारतामध्ये परतायचं हा विचार पक्का झाला आणि भारतात जाऊन काय करायचं, तर कोरडवाहू शेती - हेदेखील मी पक्कं ठरवलं! सगळ्या देशातील दारिद्र्याचं मूळ हे ह्या कोरडवाहू शेतीमध्ये आहे, अशी माझ्या मनाची खात्री पटली होती."

 हळूहळू व्यक्तिगत पातळीवरही जोशींच्या मनात बरीच कटुता जमा होत होती. याची काही कल्पना टोनी यांच्या बोलण्यावरून येते. शिवाय जोशींचा युपीयुमधील स्टाफ असोसिएशनचा व एकूण सामाजिक वर्तुळाचा अनुभवही फारसा चांगला नव्हता. ते एकदा म्हणत होते,
 "तिथल्या बहुतेक लोकांच्या मनात भारतीय माणूस म्हटल्यावर एक विशिष्ट प्रतिमा असते. देवभोळा, हिंदू परंपरा पाळणारा वगैरे. किंवा मग भांडवलदारांवर, उद्योगक्षेत्रावर, आधुनिक तंत्रज्ञानावर सतत टीका करणारा वगैरे. मी या दोन्ही प्रकारांत बसणारा कधीच नव्हतो. भारतीय म्हणून एखाद्याने जी भूमिका घ्यावी असं त्यांना वाटायचं, तसं वागणारे, किंवा वरकरणी तशीच भूमिका घेणारे, इतर अनेक उच्चभ्रू भारतीय तिथे यायचे. ह्या उच्चभ्रूचं ते प्रतिमा जपणं मला ढोंगीपणाचं वाटे. मी कधीच तो प्रकार केला नाही. दुसरं म्हणजे, भारतासारख्या मागासलेल्या देशातील माणसाला परदेशी खरी प्रतिष्ठा, खरं बरोबरीचं स्थान हे कधीच मिळत नाही.
 म्हणजे वरकरणी सगळं नॉर्मल असतं, तुमचा अपमान वगैरे कोणी करत नाही, कायदेही सगळे सर्वांना समान असतात; पण त्यांच्या मनात एक दुरावा कायम असतोच. त्यांच्या समाजाचा एक घटक म्हणून ते तुमचा कधीच स्वीकार करत नाहीत. शिवाय तुम्ही व्यक्तिशः कितीही कर्तबगार असला, तरी तुमच्या देशाच्या एकूण मागासलेपणाचं ओझं तुमच्या खांद्यावर असतंच. तुमचं मूल्यमापन करताना तुम्ही शेवटी एक भारतीय आहात, मागासलेल्या देशातले आहात, ह्याचा त्यांना सहसा कधी विसर पडत नाही."
 जोशींसारख्या मानी माणसाला हे सारे सहन होत नसे.
 बांगलादेशातील यादवी युद्ध, भारतात आलेल्या बांगला निर्वासितांच्या छावण्या, भारतातील दुष्काळ, उपासमार, भ्रष्टाचार आणि त्याचवेळी काही जण मात्र श्रीमंत राष्ट्रांतील श्रीमंत वर्गानही हेवा करावा अशा विलासी थाटात मजा मारत आहेत अशी चित्रे त्यावेळी पाश्चात्त्य टीव्हीवरून जवळजवळ रोजच दाखवली जात होती. साधारण त्याच काळात सिक्कीमचे भारतात विलीनीकरण करण्याची प्रक्रिया सुरू झाली होती. त्या प्रकरणातदेखील भारत सरकार एका छोट्या पण स्वायत्त देशाशी दांडगाई करत आहे असे मानणारा एक मोठा वर्ग पाश्चात्त्य जगात होता. "हे सारं तुमच्या देशात होत असताना तुमच्यासारख्या कर्तृत्ववान भारतीयाने इथे युरोपात राहावं हे तुमच्या सरकारला परवडतं तरी कसं काय?" असा प्रश्न जोशींना एका इंग्रज अधिकाऱ्याने विचारलाही होता.

 प्रश्नाचा गर्भितार्थ अगदी स्पष्ट होता; त्यांना असे म्हणायचे होते की – तुम्ही तुमच्या देशात जाऊन तिथले प्रश्न सोडवायच्याऐवजी इथे युरोपात काय मजा मारत बसला आहात?

डोंगरकुशीतल्या नंदनवनात७७