पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/७९

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

कालावधीत तुम्ही काम करू शकता. ते तुम्हाला पुण्याभोवतीच्या खेड्यांमधून घेऊन जातील, तेथील शेतकऱ्यांमधील आमचे काम तुम्ही पाहू शकाल," असेही त्यात लिहिले आहे.
 त्यानंतर दोन वर्षांनी, २६ मार्च १९७६ रोजी, दिल्लीत प्रधानमंत्री कार्यालयातील सचिवांना जोशींनी बर्नहून एक महत्त्वाचे पत्र लिहिले आहे. त्या पत्रात भारतात परतायचा व शेतीविषयक काम करायचा आपला निर्णय त्यांनी कळवला आहे. सोबत आपल्या मनातील प्रकल्पाचा आराखडाही पाठवला आहे. त्यासाठी शासनाकडून पडीक जमीन उपलब्ध होईल का' अशी विचारणा केली आहे. असेच पत्र आपण महाराष्ट्र राज्याच्या मुख्य सचिवांना पाठवले असल्याचा पत्रात उल्लेख आहे. "ही जमीन मी रोख पैसे देऊन विकत घेईन. शासनाकडून कुठल्याही प्रकारच्या साहाय्याची मला अपेक्षा नाही," हेही पत्रात स्पष्ट केलेले आहे हे मुद्दाम नमूद करण्यासारखे आहे.
 प्रस्तुत पत्राला सहसचिव, प्रधानमंत्री सचिवालय, यांनी लिहिलेले ५ एप्रिल १९७६ तारखेचे उत्तर उपलब्ध आहे. त्यात लिहिले आहे,
 "तुमचे पत्र व सोबतचा तुम्ही बनवलेला कमीत कमी भांडवल वापरून शेती करायच्या पायलट प्रोजेक्टचा आराखडा मिळाला. या महत्त्वाच्या विषयात तुम्ही स्वारस्य घेत आहात याचे कौतुक वाटते. आपल्याला हे पटेलच की केवळ कच्च्या आराखड्याच्या आधारावर विस्ताराने काही प्रतिसाद देणे आम्हाला अवघड आहे, पण महाराष्ट्रात परतल्यावर तुम्ही तेथील शासनाशी चर्चा करणार असल्याचे तुम्ही पत्रात लिहिलेच आहे. महाराष्ट्र शासनाकडून तुम्हाला नक्कीच सर्व अपेक्षित उत्तरे मिळतील."
 पत्रासोबत आपल्या योजनेचा कच्चा आराखडा जोडला असल्याचा उल्लेख जोशींनी केला आहे, व तो मिळाल्याचा उल्लेख सहसचिवांच्या उत्तरात आहे, पण दुर्दैवाने त्या आराखड्याची प्रत मात्र जोशी यांच्या कागदपत्रांत उपलब्ध झाली नाही. ती उपलब्ध असती, तर तो एक महत्त्वाचा दस्तावेज ठरला असता.
 या सर्व पत्रव्यवहारावरून एक गोष्ट स्पष्ट होते. ती म्हणजे भारतात प्रत्यक्ष परतायच्या निदान दोन वर्षे आधी भारतात परतायचे व परतल्यावर कोरडवाहू शेतीविषयक प्रयोग करायचे जोशी यांचे ठरले होते व त्यादृष्टीने बरेचसे नियोजनही त्यांनी केले होते.

 १ मे १९७६ रोजी, म्हणजे युपीयुमध्ये दाखल झाल्यानंतर बरोबर आठ वर्षांनी, जोशी भारतात परतले. तिथेच राहिले असते तर २००१पर्यंत त्यांना नोकरी करता आली असती पण त्यांचा निश्चय अविचल होता. टोनी म्हणाले,

 "त्यानंतर त्याचा व माझा काहीच संबंध राहिला नाही. आमच्यात पत्रव्यवहारदेखील कधी झाला नाही. तो भारतात शेतकऱ्यांना वाजवी भाव मिळावा यासाठी काही काम करतो, एवढं फक्त मला कुठूनतरी ऐकून कळलं होतं. अशीच जवळजवळ दोन वर्षं गेली. मग साधारण १९७८च्या सुमारास अचानक त्याचं मला पत्र आलं. त्याला झुरिकजवळ स्प्रायटेनबाख (Spritenbach) नावाच्या गावी असलेली झ्वीबाख (Zwibach) पोटॅटो

डोंगरकुशीतल्या नंदनवनात७९