पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/६६

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

विचार न करता पुस्तकं विकत घेण्यातला आनंद मी तिथे भरपूर उपभोगला. प्रचंड वाचन केलं," ते एकदा सांगत होते.

  "इतकी वर्षं तुम्ही दोघांनी एकत्र काम केलं; ह्या कालावधीतील ऑफिसमधल्या काही आठवणी तुम्ही सांगू शकाल का?" ह्या प्रश्नाला उत्तर देताना टोनी म्हणाले,
 "आठवायला लागलं तर अशा बऱ्याच आठवणी आहेत. आपल्या कामात शरद खूप हुशार होता. एका परिषदेतील त्याच्या सादरीकरणाने प्रभावित होऊन युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्रॅम (UNDP) ह्या एजन्सीने ती युपीयुच्या टेक्निकल असिस्टन्स प्रोग्रॅमला देत असलेल्या निधीत लगेचच मोठी वाढ केली होती. अनेकांनी शरदची त्यावेळी स्तुती केली, पण तेवढ्यापुरतीच; नंतर सगळे त्याला विसरून गेले! त्याला अपेक्षित होती ती नोकरीतली बढती काही शरदला मिळत नव्हती. एकूणच आपल्याला आपल्या कामाचं उचित श्रेय कधी मिळत नाही असं त्याला नेहमीच वाटत असे व हा त्याच्या कमनशिबाचाच एक भाग आहे असं तो म्हणायचा. मला आठवतं, एकदा एका खात्यात चांगली सिस्टिम लावून देण्यासाठी त्याने खूप मेहनत घेतली. तिथून त्याची लौकरच दुसऱ्या खात्यात बदली होणार होती हे त्याला ठाऊक होतं, पण तरीसुद्धा त्याने हे परिश्रम घेतले होते. मी त्याला विचारलं, 'तू तर आता इथून जाणार. मग ह्या सगळ्याचा तुला काय फायदा होणार? कशासाठी हे श्रम घेतलेस तू?' त्याचं उत्तर माझ्या आजही लक्षात आहे. तो म्हणाला होता, 'आपण लावलेल्या झाडाची फळं आपल्याला खायला मिळणं हे प्रत्येकाच्या नशिबात नसतं.'

 “मग त्याने मला येशू ख्रिस्ताच्या चौथ्या शिष्याची एक गोष्ट सांगितली होती. ती साधारण अशी होती. बेथलेहेममध्ये ज्या दिवशी ख्रिस्तजन्म झाला त्या दिवशी आकाशात एक खूप तेजस्वी तारा दिसला होता – ज्याचं प्रतीक म्हणून आम्ही ताऱ्याचा आकार असलेले कंदील नाताळच्या दिवशी लावतो. त्यावेळी असे तीन संत होते, ज्यांना तो तारा बघून कळलं, की येशूचा, देवाच्या मुलाचा जन्म होतो आहे व ते तिघे जण येशूचं स्वागत करायला बेथलेहेमकडे निघाले. यथावकाश ते तिथे पोहोचले व त्यांनी लहानग्या येशूचं कोडकौतुक केलं. तीन संतांची ही कथा प्रसिद्ध आहे, पण दुसरा एक भाग त्यात आलेला नाही. तो म्हणजे सामिरतान (समॅरिटन) नावाच्या तशाच एका चौथ्या संताची कथा. पुढे कुठल्यातरी एका इंग्रजी लेखकाने ती लिहिली होती व शरदच्या वाचनात आली होती म्हणे. हा संतदेखील तो तारा पाहन इतर तीन संतांच्या आधीच युरोपातून मध्यपूर्वेत बेथलेहेमला यायला निघाला होता; पण वाटेतल्या एका जंगलात काही लुटारूंनी त्याला पकडलं. त्याचं सगळं सामान लुटलं; अगदी त्याचे कपडेसुद्धा काढून घेतले आणि समुद्रकिनाऱ्यावर एका गुलामांचा व्यापार करणाऱ्याला विकलं. ख्रिस्ताचा पहिला संत बनण्यासाठी जो निघाला होता, तो अशाप्रकारे गुलाम बनला. त्या व्यापाऱ्याने सामिरतानला बोटीत भरलं व आफ्रिकेला नेऊन गुलाम म्हणून विकलं. गुलामगिरीच्या नरकयातना सोसत, चाबकाचे फटके खातखात त्याने अनेक वर्ष कशीबशी काढली. एक दिवस अचानक कशीतरी संधी मिळाली व तो मालकाच्या घरून पळाला. मनात

६६अंगारवाटा... शोध शरद जोशींचा