पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/६५

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

एक वेगळंच रूप त्या दिवशी मला दिसलं!
 "खूप मजेत गेली ती वर्षं. आमच्या इमारतीतली इतरही बहुतेक सर्व कुटुंबं युएनबरोबरच काम करणारी होती. बऱ्यापैकी समवयस्क होती. आमची छान गट्टी जमली. संध्याकाळी तळमजल्यावरच्या पार्किंग लॉटवर आम्ही एक बॅडमिंटन कोर्ट तयार केलं होतं. टेबलटेनिसचीपण सोय होती. जवळ जवळ रोजच संध्याकाळी जेवल्यानंतर सगळे एकत्र खेळायचो. तिथेच एका कोपऱ्यात बार्बेक्यू होता व दुसऱ्या कोपऱ्यात बार. शरद स्वतः बहुतांशी शाकाहारी होता, पण लीला व मुली मात्र सगळं खात. शरदला ड्रिंक घेणं आवडायचं. खूपदा आम्ही एकत्र जेवायला जायचो, पण त्याला ड्रिंक चढलं आहे असं मात्र इतक्या वर्षांत मी कधीही पाहिलं नाही. तसं त्याचं वागणं अगदी संयमी होतं. पाश्चात्त्य रीतीरिवाज, खाणंपिणं, कपडे हे सारं इथे आल्यावर अगदी थोड्याच दिवसांत जोशी कुटुंबीयांच्या पूर्ण अंगवळणी पडलं होतं. ते सारे उत्तम फ्रेंच बोलत. आमच्या घरापासून जवळच प्रसिद्ध गानटू (Gantu) डोंगराची सुरुवात होती. बहुतेक रविवारी आम्ही डोंगरावर जायचो. स्कीइंग आणि डोंगर चढणं हे आमचे जणू राष्ट्रीय खेळच आहेत. पुढे शरदलाही डोंगरांमधून मनसोक्त भटकणं आवडू लागलं. बाहेर खूप थंडी व पाऊस असेल तर मात्र घरात राहावं लागे.
 "अशावेळी शरदला बुद्धिबळ खेळायला आवडायचं. अर्थात मला स्वतःला बुद्धिबळ फारसं येत नसे. त्यामळे प्रत्येक वेळी तोच जिंकायचा. एकदा दपारी मी त्यांच्या घरी गेलो असताना समोर टेबलावर ठेवलेलं How to play Chess नावाचं एक पुस्तक मला दिसलं. सहज म्हणून मी ते वाचायला लागलो. आवडलं म्हणून घरी घेऊन गेलो व पूर्ण वाचून काढलं. योगायोग म्हणजे त्या रात्री आम्ही बुद्धिबळ खेळायला बसल्यावर सगळे डाव तो हरला! हे मोठंच आश्चर्य होतं. 'टोनीने तुला चेकमेट करणं म्हणजे अगदी नवलच आहे! असं कसं झालं?' लीलाने विचारलं. 'कारण तो माझ्यापेक्षा चांगला खेळला म्हणून' एवढंच त्यावर शरद म्हणाला, मला स्वतःलाही मी कसा जिंकू शकलो ह्याचं नवल वाटलं. कदाचित त्या पुस्तकाचा तो परिणाम असेल! पण त्यानंतर एक गोष्ट घडली, जिचं स्पष्टीकरण मी आजही देऊ शकणार नाही. ती म्हणजे त्या रात्रीनंतर शरदने माझ्याशी बुद्धिबळ खेळणं पूर्ण बंद केलं. दोन-तीनदा 'चल, एक डाव टाकू' असं मी सुचवलं, पण त्याने स्पष्ट नकार दिला. न खेळण्याचं कारणही त्याने काहीच सांगितलं नाही."
 

 आपले ऑफिसमधील काम सुरुवातीला जोशी यांना खूप आवडत होते. अर्थात त्यात प्रत्यक्ष कामापेक्षा ऑफिसातील अत्याधुनिक सुखसोयी, आंतरराष्ट्रीय वातावरण, कार्यसंस्कृती ह्यांचा वाटा अधिक होता. कामात कसलाही ताण नसे. शनिवार-रविवार सुट्टी असे. त्यामुळे वाचनासाठी भरपूर वेळ उपलब्ध असे. युपीयुचे सुसज्ज ग्रंथालय होते व शिवाय स्वतःच्या कामाला उपयुक्त अशी पुस्तके विकत घेण्याची अधिकाऱ्यांना मुभा होती. कामाच्या निमित्ताने जिनिव्हाला सारखे जावे लागे. तिथे पुस्तकांची मोठी मोठी दुकाने होती. जिनिव्हातले अधिकृत काम आटोपले, की तासन्तास या दुकानांत जोशी रमत. “किंमत किती आहे ह्याचा जराही

डोंगरकुशीतल्या नंदनवनात६५